महाविकास आघाडीत बिघाडी; जागा वाटपाचा वाद चव्हाट्यावर

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची ठाकरे गटावर खोचक टीका

महाविकास आघाडीत बिघाडी; जागा वाटपाचा वाद चव्हाट्यावर

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जागा वाटपावरून ठकारे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद झाला असून हा विकोपाला गेल्याची माहिती समोर आली आहे.एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत.

शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर भाष्य केले. ते म्हणाले की, आता वेळ खूप कमी आहे. महाराष्ट्राचे काँग्रेस नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत, असं मला वाटतं. त्यांना वारंवार दिल्लीत लिस्ट पाठवावी लागते मग चर्चा होते. आता ती वेळ निघून गेली आहे. आमची इच्छा आहे की, लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय व्हावा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फार काही मतभेद नाहीत. काँग्रेससोबतही नाहीयत, पण काही जागा आहेत, ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष दावा करत आहे.

यानंतर दुपारी महाविकास आघाडीमधील पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याबाबत नाना पटोले यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, संजय राऊत उद्धव ठाकरेंचं म्हणणं ओलांडत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे उत्तर नाना पटोले यांनी दिलं आणि पुढे बोलणे टाळले. यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी परिस्थिती सांभाळून घेतली. मात्र, पुढे ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे जागा वाटपाचा वाद महाविकास आघाडीमध्ये विकोपाला गेल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

हे ही वाचा..

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले आप नेते १८ महिन्यानंतर तुरुंगातून येणार बाहेर

सद्गुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून एका गैर-स्थानिकाची हत्या!

तोंडाला स्कार्फ बांधून सोफ्यावर धूळ खात बसलेल्या सिनवारला इस्रायलने ठोकले!

यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीमध्ये या अंतर्गत कालहावर भाष्य केले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “नाना पटोले मविआच्या बैठकीत नकोच; उबाठा शिवसेनेचा फतवा. एकाच्या पाठीत खंजीर खुपसून दुसरीकडे गेले तरी टोमणाबाईंची धुसफूस काही संपत नाही,” असा खोचक टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

Exit mobile version