जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवाद्याला दहशतवादीच म्हणा, असे आवाहन जम्मू काश्मीरच्या नागरिकांना केले. काही लोक राज्यात विकास झाल्याचे मान्य करतात, मात्र दहशतवाद्याला दहशतवादी म्हणण्यास थोडे अडखळतात. हा दुटप्पीपणा करू नका,’ असे आवाहन त्यांनी केले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
‘जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित असल्यानेच येथे विकास होऊ शकला. मी येथे आल्यापासून सांगत आहे की, शांतता असेल तरच विकास होईल. जर शांतता नसेल तर जगातील कोणत्याही भागात विकास होऊ शकत नाही,’ असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. काश्मीरसह जम्मूतील नागरिकांनीही हे लक्षात घेतले पाहिजे. दहशतवाद्याला दहशतवादीच म्हटले पाहिजे. ज्या व्यक्ती भेदभाव करतात, त्या शांतता आणि विकासाच्या शत्रू आहेत. या व्यक्ती समाजाची शांतता आणि विकासाला सर्वांत मोठा धोका असल्याने आपण अशा व्यक्तींना वेगळे ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
इम्रान खान यांना अटक, पाच वर्षे राजकारणातून बाद
…जेव्हा पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण मुख्यमंत्री योगींच्या मोठ्या बहिणीला भेटते!
भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
एनआयएकडून अकिब नाचन याला पडघ्यातून अटक
‘जम्मू आणि काश्मीरच्या परिस्थितीत खूप सुधारणा झाली आहे. रस्त्यावरील हिंसाचार थांबला आहे. हा खूप मोठा बदल आहे. काही व्यक्ती फुटीरतावाद किंवा दहशतवाद पसरवत होत्या. पाकिस्तानात बसून बंदचे आवाहन करत असत आणि दुकाने, व्यावसायिक संस्था, शाळा आणि कॉलेजे वर्षातील १५० दिवस बंद असत. ही परिस्थिती आता नाही. येथील नागरिक सूर्यास्ताआधी घरी परतत असत. आता तुम्ही श्रीनगरमध्ये संध्याकाळी लोकांना आइस्क्रीमचा आनंद लुटताना आणि गिटार वाजवताना बघू शकता. आता येथील नागरिक त्यांच्या इच्छेनुसार, त्यांचे जीवन जगू शकत आहेत,’ असेही सिन्हा यांनी नमूद केले.
आतापर्यंत एक कोटी २७ लाख पर्यटक काश्मीरला
सन २०२३च्या पहिल्या सात महिन्यांतच जम्मू- काश्मीरला तब्बल एक कोटी २७ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. या वर्षाखेरीस हा आकडा सव्वा दोन कोटीपर्यंत पोहोचण्याची आशा आहे. गेल्या वर्षी एक कोटी ८८ लाख पर्यटक जम्मू-काश्मीरला आले होते, अशीही माहिती उपराज्यपालांनी दिली.