जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदीरात बॉंबस्फोट करून सामाजिक सलोख्याला धक्का देण्याचा भ्याड कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी तीन पाकिस्तानी घुसखोरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीतून हा कट समोर आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश कुमार अंग्राल यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी घुसखोर मंदिरात बॉंबस्फोट घडवून आणणार होते, जेणेमुळे सामाजिक सलोख्यात बाधा निर्माण होईल. ताब्यात घेतलेल्या घुसखोरांकडे सापडलेल्या फोनमध्ये बॉंबस्फोट घडवण्याबाबतचे व्हिडिओसुध्दा सापडले.
स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एस.ओ.जी) आणि ४९ राष्ट्रीय रायफल्सच्या कर्तव्यदक्षतेमुळे हा कट उघडकीस आला. मुस्तफा इक्बाल खान आणि मुर्तजा इक्बाल अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन भावांची नावे आहेत. मुस्तफा याला पाकिस्तानातून फोन करून बॉंबस्फोट घडवून आणण्याची सूचना देण्यात आल्याचे चौकशी अंती समोर आले आहे. मुस्तफा याने दिलेल्या कबुलीनुसार लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ बालाकोट येथून त्याचे दोन साथीदार मोहम्मद यासीन आणि रईस अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी १३ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या श्रुंखलेचा पुढचा भाग, म्हणून हा हल्ला करण्यात येणार होता अशी धक्कादायक माहिती चौकशी अंती समोर आली आहे.