जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद शेवटचे श्वास मोजतोय

पंतप्रधान मोदींचा डोडामधून कठोर इशारा

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद शेवटचे श्वास मोजतोय

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथे जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, १४ सप्टेंबर रोजी जम्मू- काश्मीरच्या डोडा येथे पोहोचले. यावेळी त्यांनी रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. यावेळी नरेंद्र मोदींनी तेथील जनतेला जम्मू- काश्मीरच्या विकासाचा आणि सुरक्षेचा विश्वास दिला. आम्ही आणि तुम्ही मिळून सुरक्षित काश्मीर बनवू, ही मोदींची हमी आहे, असं ते म्हणाले. तसेच यावेळी जम्मू-काश्मीरच्या निवडणुका भविष्याचा फैसला करणार आहेत, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

दगडफेक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडांनीचं नवे जम्मू-काश्मीर निर्माण होतंय

नरेंद्र मोदींनी म्हटलं की, “जम्मू- काश्मीरमध्ये राहणारा कोणताही व्यक्ती, मग तो कोणत्याही धर्माचा किंवा वर्गाचा असो, तुमच्या सर्व हक्कांचे संरक्षण करणे हे आमचे प्राधान्य आहे. भाजपा दहशतवादमुक्त आणि पर्यटकांसाठी नंदनवन असणारा जम्मू- काश्मीर बनवणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आता शेवटचे श्वास मोजत आहे. गेल्या १० वर्षात येथे झालेला बदल स्वप्नापेक्षा कमी नाही. पूर्वी पोलिस आणि लष्करावर दगडफेक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडांनीचं नवे जम्मू-काश्मीर तयार होत आहे. दिवस मावळताच इथे अघोषित कर्फ्यू लावला जायचा तो काळ आठवतो का? परिस्थिती अशी होती की, काँग्रेसच्या केंद्र सरकारचे गृहमंत्री लाल चौकात जायलाही घाबरत होते. पण बदल झाला आणि हे सर्व कोणी केले आहे? मोदींनी हे केले नाही, तुम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांनी हे केले आहे,” असा विश्वास व्यक्त करत नरेंद्र मोदींनी काँग्रेससह माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

तीन कुटुंबांनी मिळून जम्मू-काश्मीरमध्ये जे केलंय ते पापापेक्षा कमी नाही

पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत जम्मू- काश्मीरमध्ये विकासाचा नवा टप्पा आला आहे आणि याचे श्रेय येथील तरुणांनाच आहे. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तीन कुटुंब आणि जम्मू-काश्मीरमधील तरुण यांच्यात आहेत. एक परिवार काँग्रेसचा, एक परिवार नॅशनल कॉन्फरन्सचा, एक परिवार पीडीपीचा या तीन कुटुंबांनी मिळून जम्मू-काश्मीरमध्ये काय केले आहे ते पापापेक्षा कमी नाही. येथील लोकांनी ज्या राजकीय पक्षांवर विश्वास ठेवला होता, त्यांना तुमच्या मुलांची काळजी नव्हती. त्यांनी फक्त आपल्या मुलांना पुढे नेले. जम्मू-काश्मीरमधील तरुणांना दहशतवादाचा सामना करावा लागला आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे पक्ष तुमची दिशाभूल करून मजा करत राहिले. या लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये कुठेही नवीन नेतृत्व उदयाला येऊ दिले नाही. २००० नंतर येथे पंचायत निवडणुका, बीडीसीच्या निवडणुका झाल्या नाहीत. २०१४ मध्ये आमचे सरकार आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील तरुणांचे नवीन नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर २०१८ मध्ये येथे पंचायत निवडणुका झाल्या, २०१९ मध्ये बीडीसी निवडणुका झाल्या आणि २०२० मध्ये पहिल्यांदा डीडीसी निवडणुका झाल्या,” अशी टीका करत नरेंद्र मोदींनी घराणेशाहीवर निशाणा साधला.

हे ही वाचा:

पंतप्रधान निवासस्थानी ‘दीपज्योती’चे आगमन!

वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या पाच जणांच्या आवळल्या मुसक्या

कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले; निर्यात शुल्कातही २० टक्के कपात

सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

अमेरिकेत पत्रकारावर अत्याचार काँग्रेसचे लोक भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत का?

“काँग्रेसचे लोक संविधानाबद्दल बोलतात आणि ‘नफरतच्या दुकाना’समोर ‘मोहब्बतचे दुकान’ असे फलक घेऊन फिरतात. आज वर्तमानपत्रात वाचले, आपली प्रसारमाध्यमे लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. अमेरिकेत गेलेल्या एका भारतीय वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने अमेरिकेत आपल्यावर कसा अत्याचार झाला याची संपूर्ण कहाणी लोकांसमोर ठेवली आहे. अमेरिकेच्या भूमीवर भारताच्या एका सुपुत्राला, पत्रकाराला आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्यावर अत्याचार हे करून भारताची प्रतिष्ठा वाढवत आहात का?” असा तिखट प्रश्न नरेंद्र मोदींनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस भारतातील सर्वात बेईमान आणि फसवा पक्ष

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला सर्वात अप्रामाणिक आणि गांधी कुटुंब सर्वात भ्रष्ट असल्याचे म्हटले. “काँग्रेस भारतातील सर्वात बेईमान आणि फसवा पक्ष आहे. काँग्रेसचे राजघराणे हे भारतातील सर्वात भ्रष्ट घराणे आहे आणि तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. ते म्हणाले की, हेच लोक सरकारी तिजोरीच्या जोरावर निवडणुका जिंकण्यासाठी अप्रामाणिक डावपेच अवलंबतात. हे लोक त्यांच्या धोरणांच्या आधारावर जात नाहीत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस शासित राज्यांमध्ये मोठ्या समस्या आहेत. काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांपासून सावध राहण्याची गरज आहे,” असे म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर प्रहार केला.

Exit mobile version