दादरच्या नायगाव पोलीस वसाहत धोकादायक असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नायगावमध्ये जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. पोलिसांची ही वसाहत धोकादायक वाटत नाही. सरकारने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं. या वसाहतींची दुरुस्ती करावी आणि निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या घरांची पाहणीही केली. त्यानंतर रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाचा काळ आहे. अशावेळी घाईघाईत या रहिवाशांना बेघर करणं योग्य नाही. सध्या कोरोना काळात शिफ्टिंग शक्य नाहीये. शिफ्टिंगसाठी ज्या जागा सुचवण्यात आल्यात त्या याहीपेक्षा खराब आहेत. त्यामुळे आहे त्याच ठिकाणी मोकळ्या जागेवर इमारती बांधाव्यात आणि मगच त्यांचं पुनर्वसन करावं, असं फडणवीस म्हणाले.
तुमच्या भावना तुमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक सेतू निर्माण करायचा म्हणून या ठिकाणी आलोय. तुमच्या भावना आणि अपेक्षा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करेन. पोलीस आयुक्तांशी बोलेन. या निर्णयाला स्थगिती द्यायला हवी, असं ते म्हणाले.
बीडीडी चाळीतल्या पोलिसांना आम्ही संरक्षण दिल होत. भलेही या सरकारने त्याच भूमिपूजन केलं होतं. पण आम्ही टेंडर काढलं. निम्म्याहून जास्त प्रक्रिया आम्ही पार पाडली. त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे, असं सांगतानाच आमच्या सरकारने पोलीस हौसिंगचा प्रस्ताव तयार केला होता. त्यावर राज्य सरकारने काम केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
‘त्या’ बसचालकाविरोधात गुन्हा दाखल
श्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ
पुरूष हॉकी संघाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतूक
पोलिसांच्या भावना जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे. यात कोणतेही राजकारण नाही. पोलीस विरुद्ध सरकार असा संघर्षाचाही प्रश्न नाही. आमच्या सहकाऱ्यांनी या वसाहतीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मला भेट देण्याची विनंती केली. त्यामुळे मी इथे आलो आहे, असंही त्यांनी सांगितलं.