लोकसभेच्या आणखी दोन खासदारांचे निलंबन; निलंबित खासदारांची संख्या १४३

फलक घेऊन सदनात प्रवेश केल्याने कारवाई

लोकसभेच्या आणखी दोन खासदारांचे निलंबन; निलंबित खासदारांची संख्या १४३

दिल्लीत सुरू असलेलं संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या चार दिवसात लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. अशातच बुधवार, २० डिसेंबर रोजी आणखी दोन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.

सी थॉमस आणि ए एम अरिफ असं निलंबित करण्यात आलेल्या लोकसभेच्या दोन खासदारांची नावे आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान फलक घेऊन अध्यक्षांच्या खुर्चीसमोरील जागेत प्रवेश केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या दोन खासदारांच्या निलंबनानंतर एकूण निलंबित खासदारांचा आकडा १४३ वर गेला आहे.

१३ डिसेंबर रोजी दोन तरुणांनी लोकसभा सदनात प्रवेश केला होता. प्रेक्षकांच्या बाल्कनीत उडी घेत तरुणांनी लोकसभा सभागृहात धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेनंतर विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली होती. यावेळी खासदारांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. यामुळे आतापर्यंत १४३ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

तामिळनाडूत पावसाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू!

शाहरुखची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस

काँग्रेसची भारत जोडो यात्रा २ जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता!

यवतमाळमध्ये जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांना संपवलं

यावर विरोधक आक्रमक झाले असून लोकसभा सचिवालयाने प्रसिद्धी पत्रक जाहीर करून लोकसभेच्या या निलंबित खासदारांना संसदीय कामकाजात भाग घेण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. या खासदारांना निलंबन कालावधीत संसदेचे चेंबर, लॉबी आणि गॅलरी येथे प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच हे निलंबित खासदार ज्या संसदीय समित्यांचे सदस्य आहेत, त्यांच्या बैठकीतून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कामकाजाच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.

Exit mobile version