सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या अंबादास दानवेंचे निलंबन

पाच दिवसांसाठी निलंबन; उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली घोषणा

सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या अंबादास दानवेंचे निलंबन

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याची घटना सोमवार, १ जुलै रोजी घडली होती. सभागृहात आक्षेपार्ह भाषा वापरणं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना चांगलेच भोवले आहे. सभागृहात सोमवारी झालेल्या प्रकरणानंतर दानवे यांचे निलंबन करण्यात आले आहे. अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या विधानपरिषदेत दिसून आले. अंबादास दानवेंनी त्यांच्याकडे हात करणाऱ्या भाजपा आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत अंबादास दानवेंनी माफी मागून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली.

अंबादास दानवे यांचे निलंबन करताना उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, गटनेत्यांच्या बैठकीला आंबादास दानवे उपस्थित नव्हते. कालच्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली नाही. आमच्या समोर हा प्रकार घडला. त्यांच्या पक्षाच्या नेते मंडळींनी विचार करायला हवा की, संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे म्हणून ही न्याय आणि उचित कारवाई केली आहे.

हे ही वाचा:

धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल

बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!

राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !

नीलम गोऱ्हे यांच्या निर्णयावर चर्चा करणाऱ्या विरोधकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, सभागृहात अशी घटना कधीही घटना घडली नाही त्यामुळे अशा ठरवावर काधीही चर्चा होतं नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आवाजी मतदानानं अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि कामकाजावर बहिष्कार टाकला.

Exit mobile version