काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. राज्यसभेत नुकत्याच घडलेल्या धक्काबुक्कीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून संसदेत घालण्यात येणाऱ्या गोंधळाविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले.
राहुल गांधी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानावर मस्तक टेकवतात. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा भारत उभा करायचा आहे. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण असल्याचे आठवले यांनी म्हटले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच आज काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी संसदेत दंगा घालण्याचे काम केले. संसदेत काम होऊनच द्यायचे नाही, या निर्धाराने काही लोकांना पाठवण्यात आले होते. विरोधी पक्षाचे सदस्य सतत सभागृहाच्या वेलमध्ये येत होते. या सगळ्यांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.
हे ही वाचा:
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक
राज्यसभेत झालेल्या अभुतपूर्व गदारोळानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याप्रकरणी केंद्र सरकारने अहवाल सादर केला असून सीपीआय(एम)चे खासदार इलामारम करीम यांनी पुरुष मार्शलचा गळा दाबत मारहाण केल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या खासदार फुलो देवी नेताम आणि छाया वर्मा यांनी महिला मार्शलला ओढत नेलं आणि मारहाण केल्याचं अहवालात नमूद करण्यात आल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.