शाहरुख खान पुत्र आर्यन खानला झालेल्या अटकेने आणि त्याला झालेल्या २६ दिवसांच्या कोठडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे व्यथित झाल्या आहेत. एक आई म्हणून हे सगळे दुःखद असल्याचे वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर पुण्यात त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणतात की, आर्यन खानला झालेली अटक ही कोणत्याही मुलाच्या कुटुंबासाठी दुःखद आहे. जी माहिती मिळते आहे, त्यानुसार त्या मुलाकडे काहीही सापडलेले नाही. मग अशा एका मुलाला २६ दिवस कशासाठी तुरुंगात ठेवले जात आहे? हा कुठला न्याय? असा प्रतिसवाल त्या करतात. यावर सर्वांनी चिंतन केले पाहिजे. तो कुणाचाही मुलगा असू दे. त्याच्यावर अन्याय झाला असेल तर केंद्र सरकारने उत्तर द्यायला हवे, असे म्हणत या सगळ्याची जबाबदारी त्यांनी केंद्र सरकारची असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
युगायुगांत एकच व्यक्ती ‘सरदार’ होऊ शकते…
‘दाऊदसोबत विमानात कोण बसले होते, हे शरद पवारांनी सांगावे’
मी तंबाखूविरोधी आहे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी तंबाखूच्या विरोधात आंदोलन करत असते. हा गंभीर विषय आहे. पण ड्रग्सच्या आहारी गेलेल्यांसाठी त्यांचे पुनर्वसन महत्त्वाचे आहे तुरुंगवास हा त्यावरचा मार्ग नाही. काही अधिकारी भाष्य करतात आणि अन्याय करतात. महाराष्ट्र व देशासाठी हे चांगले नाही. मी राजकीय म्हणून हे म्हणत नाही पण सगळे गंभीर आहे. शाहरुखसारखा अभिनेता हा आंतरराष्ट्रीय अभिनेता आहे. बॉलीवूड ही भारताची ओळख आहे. आम्ही जेव्हा परदेशात जातो तेव्हा आवर्जून सगळे परदेशातले लोक बॉलीवूडबद्दल आवर्जून विचारतात. तेव्हा अशा या प्रकरणांमुळे महाराष्ट्राचं नाव खराब होतं, भारताचं नाव खराब होतं. एखादा अधिकारी असं करत असेल तर महाराष्ट्राला ते काळीमा फासणारं आहे. हे दुर्दैवी आहे. अर्थात, ड्रग्सविरोधात आंदोलन केलं पाहिजे. पण २६ दिवसांतून आर्यन खानकडे काहीही सापडले नाही मग अटक तरी का केली? असेही सुप्रिया सुळे विचारतात.
शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरून ताब्यात घेण्यात आले होते. त्याला पकडण्यात आल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य ठरले आहेत. स्वाभाविकच आर्यन खानबद्दल त्यांनी वेळोवेळी सहानुभूती व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंविरोधात आरोपांचे सत्र सुरू केले आहे आता सुप्रिया सुळेदेखील समीर वानखेडे यांचे नाव न घेता त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत असल्याचे म्हणत आहेत.