भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने आपल्या पहिल्या यादीत पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाची ही पहिली यादी असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत पाच उमेदवरांची नावे जाहीर झाली आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे यांना संधी देण्यात आली असून शिरूर लोकसभा मतदार संघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी मिळाली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून नितेश कराळे गुरुजी इच्छूक होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची तीन वेळा भेटही घेतली होती. पण त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही.
सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे निश्चित आहे. वर्ध्यातून अमर काळे, शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे तर नगरमधून निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही पहिली यादी असून अजून एक यादी जाहीर होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार याकडे लक्ष असणार आहे.
भाजपाकडून काही दिवसांपूर्वी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी सुजय विखे पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. आता शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश लंके यांनी कालच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुध्द सुजय विखे पाटील अशी लढत होणार आहे.
हे ही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणीची जागा रासपाच्या महादेव जानकरांना
इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम
इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी
डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली; मॅट हेन्रीची एण्ट्री
दरम्यान, पवार गटाच्या यादीत साताऱ्याची जागा घोषित करण्यात आलेली नाही. साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी शरद पवार कुणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. साताऱ्यातून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण लढण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत.