सुप्रिया सुळे म्हणतात, नवाब मलिक निर्दोष

मलिक यांना जामीन मिळाल्यावर राष्ट्रवादीत आनंदीआनंद

सुप्रिया सुळे म्हणतात, नवाब मलिक निर्दोष

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रात या पक्षाकडून आनंदीआनंद साजरा करण्यात येत आहे. त्यातच या पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत नवाब मलिक यांना निर्दोष ठरवले आहे.

 

 

नवाब मलिक हे जवळपास दीड वर्षासाठी दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीशी व्यवहार केल्याच्या आरोपावरून तुरुंगात होते. मनीलॉन्ड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. पण वैद्यकीय कारणावरून त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ही बातमी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आनंद व्यक्त केला गेला. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाबभाई मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, हि आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. ते निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय कारणांमुळे तुरुंगात ठेवण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. आम्हा सर्वांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून ते लवकरच दोषमुक्त होतील हा विश्वास आहे.

हे ही वाचा:

आपचे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित !

मॉब लिचिंग करणाऱ्यांना यापुढे मृत्युदंडाची शिक्षा !

मुरादाबादमध्ये भाजप नेत्याला भर रस्त्यात चालताना घातल्या गोळ्या

अमित शाहांची मोठी घोषणा; इंग्रजांच्या काळातले तीन कायदे बदलणार

 

सुप्रिया सुळे यांनी केवळ राजकारणासाठी नवाब मलिक यांना तुरुंगात ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नवाब मलिक हे दहशतवादी असलेल्या दाऊद इब्राहिमसह संबंध असलेल्या व्यक्तीशी व्यवहार केल्याच्या कारणावरून तुरुंगात गेलेले असताना त्यांना आता जामीन मिळाल्यावर सुप्रिया सुळे या केवळ राजकारणासाठी त्यांना अडकविण्यात आल्याचा दावा करतात याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

 

 

नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यावर ते कोणत्या गटात जाणार यावरून चर्चाही सुरू झाल्या. शरद पवार यांचे नेतृत्व झुगारून सध्या अजित पवार हे काही आमदारांसह सत्तेत विराजमान झालेले आहेत. तर शरद पवार यांच्या गटाचे कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंकडे जबाबदारी आहे. तिकडे या दोन्ही गटात चिन्ह आणि पक्षाचे नाव यावरून निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मलिक हे कोणत्या गटात जाणार याचीही चर्चा लगेच सुरू झाली.

 

 

मलिक कुटुंबियांच्या मुलाखतीही यानिमित्ताने प्रसारमाध्यमात झळकल्या. मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना अश्रु अनावर झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले तर त्यांची कन्या निलोफर हिने ट्विट करत वेलकम बॅक लीडर अशा शब्दांत मलिक यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी पेढे भरवून, फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

 

Exit mobile version