सर्वोच्च न्यायालयाच्या वकील सुबुही खान यांचा हिजाब वादासंबंधाचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या व्हिडीओमधून त्यांनी हिजाब वादावर भाष्य केले आहे. मुस्लिम मुलींना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यास प्रवृत्त करणाऱ्या इस्लामवाद्यांच्या दुहेरी स्वभावाचा पर्दाफाश केला. सुबुही खान या ‘शायनिंग इंडिया न्यूज’च्या पत्रकाराशी बोलत होत्या. हा व्हिडिओ १२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला आहे.
अनेक दशकांपासून कोणाला काहीच समस्या नव्हती, पण आता अचानक काही मुस्लिम मुलींना कॉलेजमध्ये हिजाब घालायचा आहे, असे खान म्हणाल्या. “राज्यघटनेचे कलम २५ हे आपल्याला आपल्या आवडीच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार देते, परंतु कोणताही अधिकार निरपेक्ष नाही. आपल्या धर्माप्रमाणे पोशाख निवडणे हा आपला हक्क आहे, असे म्हणणारे मग अलिगढ मुस्लीम विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया मधील बिगर मुस्लिम विद्यार्थ्यांना शेरवानी आणि सलवार कमीज घालायला का लावतात? असा दुटप्पीपणा का? असे प्रश्न खान यांनी उपस्थित केले आहेत.
प्रत्येकाला त्यांच्या खाजगी आयुष्यात काय घालायचे आहे ते निवडण्याचा अधिकार आहे. हाच अधिकार मुस्लिम महिलांनाही लागू आहे. तथापि, सर्व मुस्लिम महिला हिजाब घालत नाहीत. “मला अबू धाबीहून धमकीचा फोन आला होता. समोरच्या व्यक्तीला मी मांडलेल्या मतांवर आक्षेप होता. तसेच त्या व्यक्तीला माझ्या लिपस्टिक आणि मोकळ्या केसांचीही समस्या होती,” असे खान म्हणाल्या. ज्या महिला हिजाब घालत नाहीत त्यांना काफिर म्हटले जाते आणि लोक त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतात. खान पुढे हे ही म्हणाल्या की, मुस्लिम महिलांनी वेळीच जागे झाले पाहिजे आणि हे वाद इस्लामिक स्टेटच्या दिशेने पहिले पाऊल आहे हे लक्षात घेतले पाहिजे, असे खान म्हणाल्या. “ज्यांना बुरख्यात बसायचं आहे, त्यांना उद्या शिक्षणाची अडचण येईल. सीरिया आणि पाकिस्तानमध्ये काय चालले आहे ते पहा,” असेही खान म्हणाल्या.
“तरुणांना फुटीरतावादाकडे ढकलले जात आहे. ते बरोबर करत आहेत एवढेच त्यांना सांगितले जाते. जेव्हा ते फुटीरतावादी बनतात तेव्हा त्यांच्यापैकी काहींना अतिरेकी बनण्यासाठी निवडले जाते. जेव्हा ते अतिरेकी बनतात तेव्हा त्यांना दहशतवादी बनण्यास ढकलले जाते. दहशतवाद कुराणातून आलेला नाही तर फुटीरतावादातून आला आहे,” असे स्पष्टीकरण खान यांनी दिले आहे. “आम्ही हिजाब, कुराण किंवा इस्लामच्या विरोधात नाही. आम्ही फुटीरतावादाच्या विरोधात आहोत,” असे मत खान यांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये दोन दहशतवादी अटकेत
‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’
भीमा-कोरेगाव आयोगाने पवारांची केली तासभर चौकशी!
“धर्म हा देशाच्या कायद्याच्या वर नाही. भारत हे इस्लामिक राष्ट्र नाही. भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकशाही संविधानानुसार कार्य करतो. राज्यघटनेचे कलम ५१ अ कर्तव्यांबद्दल सांगितले आहे. पुढे येऊन फुटीरतावादाच्या विरोधात आवाज उठवणे ही भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी म्हटले.
मंगळसूत्र हे आपली ओळख लपवत नाही, निकाब करतो. मुस्लिमांनी विचार केला पाहिजे की, जर चेहरा झाकलेल्या एखाद्याने त्यांच्या दारावरची बेल वाजवली तर ते त्या व्यक्तीला त्यांच्या घरात येऊ देतील का? नाही ना. जर त्यांना त्यांच्या घराची एवढी काळजी आहे तर त्यांना देशाची काळजी का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
कुराणात बुरख्याचा उल्लेख नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यात फक्त शरीराचा वैयक्तिक अवयव झाकण्याबद्दल बोलले आहे, पण कट्टरतावादी मुस्लिम महिलांना बुरखा घालायला लावतात. उत्तर प्रदेशमधील मुस्लिम महिला योगी सरकारवर खूश आहेत. योगींकडे सत्ता यावी असे त्यांना वाटते. मात्र, विरोधी पक्ष मुस्लीम महिलांना भडकवण्यासाठी अशा वादांना खतपाणी घालत आहेत जेणेकरून ते पुन्हा सत्तेत येऊ शकतील. मुस्लिम महिलांनी आधीच्या सरकारची तुलना करावी आणि कोणाच्या सरकारमध्ये त्यांना सुरक्षित वाटते याचा विचार करावा. त्यानुसार मतदान करावे असे आवाहन खान यांनी केले आहे.