27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणअपात्रास्त्र निकामी, ११ जुलैच्या आत गेम होणार?

अपात्रास्त्र निकामी, ११ जुलैच्या आत गेम होणार?

Google News Follow

Related

संख्याबळ गमावलेल्या महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर पेच काढून सरकार टिकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विधानसभेत तिन्ही पक्ष आणि अपक्ष मिळून १७० आमदारांचा सरकारला पाठिंबा होता. परंतु त्यापैकी सुमारे ५० आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला रवाना झाल्यापासून सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे १६ आमदारांना अपात्र करायचे, जेणे करून उर्वरीत आमदार नाक मुठीत घेऊन शरण येतील आणि सरकार वाचेल असा हिशोब करून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना नोटीस बजावली आणि ४८ तासांत नोटिशीचे उत्तर द्यायला सांगितले. या आमदारांना अपात्र केल्यावर सरकार वाचेल असा ठाकरे सरकारचा हिशोब होता. परंतु शिंदे गटाच्या आमदारांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज त्यांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत महाविकास आघाडीचे सर्व डावपेच उधळले गेले.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जे.बी.पारडीवाला यांच्या खंडपीठाने उपाध्यक्षांच्या पत्राला उत्तर देण्याची मुदत १२ जुलैपर्यंत वाढवली. याप्रकरणी उपाध्यक्ष झिरवळ यांनाही सविस्तर प्रतिज्ञापज्ञ दाखल करायला सांगितले आहे. ज्याच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल आहे, तो न्यायाधीश कसा बनू शकतो, असा मार्मिक सवाल खंडपीठाने केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल २० जूनला रात्री जाहीर झाले. २२ जूनला अपक्ष आमदार महेश बालदी, विनोद अगरवाल यांनी उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचे पत्र दिले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, शिवसेनेपेक्षा महाविकास आघाडीला झटका देणारा शिंदे गट हा तयारीत होता. नेमक्या त्याच पत्रामुळे महाविकास आघाडीची सर्वोच्च न्यायलयात गोची झाली.
शिवसेनेची रणनीती या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासून फसलेली आहे. शिंदे यांना हटवून शिवसेनेने अजय चौधरी यांची गटनेते पदी आणि प्रतोद पदी सुनील प्रभू यांची नियुक्ती केली.

चौधरी, प्रभू, खासदार अरविंद सावंत आणि शिवसेनेचे आमदार यांच्या शिष्टमंडळाने पक्षविरोधी कारवायांसाठी १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे असे पत्र झिरवळ यांना दिले. परंतु यातून काहीही साध्य होणार नाही, असा विश्वास शिवसेनेला असावा कारण या शिष्टमंडळात सामील असलेले ठाकरे सरकारचे मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीनंतर व्हाया सुरत- गुवाहाटीला रवाना झाले. अपात्रतेचे अस्त्र फुसके आहे, हे तेव्हाच सिद्ध झाले.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता ११ जुलैची तारीख दिली आहे. तोपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांना अभय आहे. हे आमदार आता अपात्र नसल्यामुळे विधानसभेत येऊ शकतात मतदान करू शकतात. यांनी फ्लोअर टेस्टची मागणी करून सरकार उलथवले तर? अशी भीती शिवसेनेला आहे. शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी ही भीती न्यायालयात व्यक्त केली.

तेव्हा आम्ही जर-तरच्या प्रश्नांवर व्यक्त होऊ शकत नाही, असे खंडपीठाने दिलेले स्पष्ट केले आहे. असे काही घडले तर आमचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या खुलाशानंतर शिवसेनेच्या मनातील भय ओसरले असेल याची काही शाश्वती नाही. कारण या संपूर्ण घटनाक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे महत्वाचे पात्र आहे. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करा असा आदेश दिला तर? संख्या बळ नसल्यामुळे आता महाविकास आघाडीचा अध्यक्ष होणे अशक्य, त्यामुळे ही निवडणूक झाली तरी सरकारचे पतन निश्चित आहे.

१८ जुलैपासून विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. सरकार मरण टाळण्याचा प्रयत्न कुठवर करणार? एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्या आगखाऊ विधानांमुळे सरकारचे मरण रोज एक पाऊल पुढे आणतायत. न्यायालयात त्यांच्या विधानांचा शिंदे गटाच्या वकीलांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. ते चाळीस आमदार नसून ती चाळीस प्रेतं आहेत. ती प्रेतं परत आल्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून देऊ, असे विधान संजय राऊत यांनी केले होते, या विधानावर टाळ्याही घेतल्या होत्या. बेताल बडबड करून मीच बाजीराव अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांची कायम धडपड सुरू असते.

हे ही वाचा:

संजय राऊतांना ईडीकडून समन्स

कसा झाला अपात्रतेच्या कारवाईचा गेम ???

‘बहुमत असेल तरच उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकतील’

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय”

 

जेव्हा याप्रकरणी तुम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल का केली नाही, असा सवाल खंडपीठाने शिंदे गटाच्या वकीलांना विचारला तेव्हा त्यांनी संजय राऊत यांच्या याच विधानाची ढाल बनवली. खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला.
संजय राऊत शिवसेनेला कसे खड्ड्यात घालतायत, त्याचे आणखी एक उदाहरण. एअरपोर्टचा रस्ता वरळीतूनच विधानसभेत जातो असे टाळीबाज डायलॉग मारणाऱ्या आदित्य ठाकरे यांना देखील ही चपराक आहे. जेवढे झेपेल तेवढंच बोलावं, असा एवढाच याचा अन्वयार्थ. एक मनसुख हिरेनचा खून पचलेला नसताना आणखी ४० प्रेत कोणाच्या उरावर घेणार आहात? राऊतांना असा शहाणपणाचा सल्ला देणारा एकही शहाणा शिवसेनेत शिल्लक नाही. केंद्रात राहुल गांधी जसे भाजपाला मजबूत करतायत. तोच वसा राऊतांनी महाराष्ट्रात घेतलेला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा