राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी वेगळे होत राष्ट्रवादीला सत्तेत सामील करून घेतले आणि आपल्या हातात सगळी सूत्रे घेतली आहेत. रविवारी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आणि सोमवारी त्यांनी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. पण ते करत असताना शरद पवार हेच आमचे नेते आहेत हेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात एक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
पक्षाने केलेली जितेंद्र आव्हाड यांची प्रदेशाध्यक्ष आणि प्रतोद ही नियुक्ती रद्द केली आहे तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिल्याचेही अजित पवार म्हणाले. जयंत पाटील यांनाही प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याचे पत्र देण्यात आले आहे. शिवाय येत्या ५ जुलैला वांद्रे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्याचीही घोषणा अजित पवारांनी केली.
सोमवारी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याआधी शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ केल्याचे जाहीर केले होते. पवारांच्या ट्विटनंतर काहीच वेळात अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत हे निर्णय फिरवले. या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की आम्ही बहुसंख्येने हा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी नेमके किती आमदार आपल्यासोबत आहेत हा आकडा सांगितला नाही. ज्यांनी सर्व आमदार आमच्यासोबत आहेत याचा दावा केला आहे त्यांना विचारा असे ते पत्रकारांना म्हणाले.
युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेता आणि प्रतोद या पदांवर एकच व्यक्ती असू शकत नसल्याचेही अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीच सरकारमध्ये सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष !
‘ते’ ९ आमदार वगळता बाकीच्यांना पक्षाची दारे खुली
शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ
अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल!
आता महायुतीचे सरकार असून ते चांगले काम करेल, असेही अजित पवार म्हणाले. सोबत असलेले छगन भुजबळ म्हणाले की अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले ही गुरू पौर्णिमेची भेट आहे. विधानसभा अध्यक्षांकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर आम्ही अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र दिले असल्याचेही अजित पवार यांनी सांगितलं.