शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. त्यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना विचारलेल्या प्रश्नाची त्यांना नीट उत्तरे देता आली नाहीत यावरून अध्यक्षांनी असेच सुरू राहिले तर सुनावणी वेळेत संपविणे कठीण होईल असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आणि आपली नाराजी व्यक्त केली.
या सुनावणीवेळी आज पुन्हा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्षनोंदवण्यात आली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारले. पण त्यांच्या काही उत्तरांवर जेठमलानी समाधानी नव्हते. त्यांनी या उत्तरांवर आक्षेप घेतला.
सकाळी ११पासून संध्याकाळी ५ या वेळेत ही सुनावणी पार पडली. सुनील प्रभू यांच्यावर व्हीपच्या मुद्द्यावरुन वकील महेश जेठमलानी यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे सुनील प्रभू यांची चांगलीच कोंडी झाली. यावेळी सुनील प्रभू यांच्या उत्तरांवर जेठमलानी समाधानी नव्हतेच पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही सुनील प्रभू यांना प्रश्नांची नेमकी उत्तरे द्या, अशी सूचना केली. त्यावर सुनील प्रभू म्हणाले, जेठमलानी आपल्याला फिरवून तेच प्रश्न विचारत आहेत. मला त्यांच्या प्रश्नांपासून संरक्षण द्या.
जेठमलानी म्हणाले की, २१ जून २०२२ रोजी जारी केलेल्या व्हीपवर आपली स्वाक्षरी आहे का? त्यावर प्रभू म्हणाले की, इथे माझं नाव लिहिलं आहे. मग ती सही माझीच असणार ना? ही माझीच सही आहे. माझी खोटी सही कोण करेल? त्यावर जेठमलानी यांनी विचारले की, २१ जूनला जारी केलेल्या व्हीपवर केलेली स्वाक्षरी आणि प्रतिज्ञा पत्रावर केलेली स्वाक्षरी ही वेगळी दिसतीय. आपल्या दोन स्वाक्षरी आहेत का? तेव्हा प्रभू यांनी आपल्या दोन सह्या असल्याचे सांगितले. सही मी पूर्ण करताना S W Prabhu अशी करतो आणि शॉर्टमध्ये करताना SP अशी सही करतो. मी विधिमंडळ सदस्य आणि व्हीप म्हणून आतापर्यंत ज्या सह्या केल्या आहेत त्या सारख्या आहेत.
जेठमलानी म्हणाले की, २१ जून २०२२ आधी आपण किती लिखित व्हीप जारी केले आहेत ? तेव्हा प्रभू यांनी सांगितले की, मला जे स्मरणात आहे त्यानुसार या कार्यकाळात दोन निवडणुका लागल्या. एक राज्यसभेची आणि एक विधान परिषदेची. दोन्ही निवडणुकीचे व्हीप मी यापूर्वी जारी केले आहेत. जेठमलानी यांनी विचारले की, २० तारखेला झालेल्या निवडणुकांमध्ये सगळ्या आमदारांनी मतदान केलं होतं का? त्यावर प्रभू म्हणाले की, हो सगळ्यांनी मतदान केले होते. जेठमलानी म्हणाले की, जर सगळ्यांनी मतदान केलं तर कोण मिसिंग होतं आणि कधीपासून ते मिसिंग झाले?
तेव्हा प्रभू यांनी सांगितले की, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं. याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही विधानसभेच्या पटलावरचे रेकॉर्ड मागवू शकता. तेव्हा जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, प्रभू वेळ वाया घालवत आहेत. प्रश्नांची गोल-गोल उत्तरे देत आहेत. माझा यावर आक्षेप आहे.
हे ही वाचा:
साडेतीन कोटी खर्च केल्याचा आरोप हास्यास्पद!
हमास नेता याह्या सिनवार आता इस्रायलच्या निशाण्यावर
धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
मोदींना पनवती म्हणणे राहुल गांधींना भोवणार!
प्रभू म्हणाले की, अध्यक्ष महोदय हे खरं नाहीये. तेव्हा जेठमलानी यांनी विचारणा केली की, उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्यानंतर व्हीप बजावण्यात आलेले डॉक्युमेंट हेच आहेत का ? त्यावर प्रभू म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आमदार मिसिंग असल्याचे कळताच बैठकीसाठी बोलविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मी हा व्हीप सर्व आमदारांना बजावला होता. त्यावर जेठमलानी म्हणाले, २० जूनला झालेल्या सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले होते का? प्रभू म्हणाले, सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते
मग जेठमलानींनी विचारले की, जर २० जूनला सर्व शिवसेना विधानसभा आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान केले तर ते कोणते आमदार मिसिंग होते असं तुम्ही म्हणताय?
त्यावर प्रभू म्हणाले, सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते. हे जर चेक करायचं असेल तर विधानभवनाच्या पटलावर हे दिसून येईल. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत होत्या की शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत. त्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर बऱ्याच आमदारांचे फोन बंद होते. त्यानंतर सातत्याने मीडियामध्ये हे आमदार गुजरात दिशेने गेल्याच्या बातम्या येत होत्या.
तेव्हा जेठमलानींनी प्रश्न विचारला की, मी स्पेसिफिक विचारत आहे की कुठले आमदार मिसिंग होते? हे सगळं सांगायची गरज नाही. यावरून मग प्रभू यांची चलबिचल वाढली. ते म्हणाले की, मला समोरून एवढे प्रश्न विचारले जात आहेत की त्याचं मला संक्षिप्त उत्तर द्यावं लागत आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, तुम्ही स्पेसिफिक बोलत नाहीत. तेव्हा प्रभू म्हणाले, मला संरक्षण द्या, समोरून उलट प्रश्न येत आहेत मी काय करू? तुम्ही म्हणाल तर मी हो किंवा नाहीमध्ये उत्तर देतो.
प्रभू तुम्ही आम्हाला सांगा की, मिसिंग झालेले आमदार कोण होते? असा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही म्हणताय की आमदार मिसिंगच्या बातम्या कानावर येत होत्या. प्रभू म्हणाले, मी ज्यांना हातोहात व्हीप द्यायला लावले जे मुंबईत उपस्थित होते. ज्यांचे फोन लागत नव्हते ते मिसिंग होते. अध्यक्षांनी वकिलांना सांगितले की, कामत आपले आमदार खूप मोठे उत्तर देत आहेत, ज्याचा मूळ प्रश्नांशी संबंध येत नाही. त्यांनी जर स्पेसिफिक उत्तर दिली तर वेळ जास्त लागणार नाही.