कर्नाटकमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी केली, त्यामध्ये सुनील कानुगोलू या ‘स्ट्रॅटेजिस्ट’चा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने नेमक्या उमेदवाराची निवड करणे, मतदारांचा कल ओळखणे आणि त्यानुसार, मोहिमेची आखणी करणे हे विजयासाठी महत्त्वाचे असते आणि तेच सुनील कानुगोलू याने दाखवून दिले.
हा ४१ वर्षीय हा तरुण ‘विविध कल्पनांचा जनक’ मानला जातो. कर्नाटकमध्ये मुळे असणारे सुनील हे तेलुगूभाषिक आहेत. ते सध्या बेंगळुरूमध्ये राहतात. त्यांचे शिक्षण चेन्नईमध्ये झाले. त्यांचे कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून उद्योग क्षेत्रात आहेत. भाजप, द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांशी काम केल्यानंतर कानुगोलू यांनी गेल्या वर्षी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्या मूल्यांवर त्यांचा विश्वास आहे, ती मूल्ये त्यांना काँग्रेसमध्ये आढळल्याने त्यांनी हे काम स्वीकारले आणि पक्षासोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांचा जवळचा मित्र सांगतो. कानुगोली यांचे सर्वांत मोठे सामर्थ्य म्हणजे त्यांचे पक्षातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांशी असलेले वैयक्तिक नाते आणि त्यांच्या रोजच्या दिनक्रमात त्यांच्या टीमच्या प्रचाराचा असलेला सहभाग.
ते शांत प्रवृत्तीचे वाटत असले तरी ते ठाम असतात. त्यांना ‘लो- प्रोफाइल’ राहायला आवडते. त्यांच्याकडे तळागाळातील सर्वेक्षणातील माहितीचा खजिना असल्यामुळे त्यांना कधीही अव्हेरले जात नाही. राजकारण्यांना त्यांच्या रोजच्या राजकीय कार्यात त्यांच्याकडील माहितीचा खूप उपयोग होतो,’ असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
कानुगोली यांनी पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, सिद्दारमैया आणि डी. के. शिवकुमार यांच्यासह के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. अर्थात हा काही अपवाद नाही. त्यांनी काम केलेल्या प्रत्येक बिगरभाजप प्रचारमोहिमेत त्यांची हीच कार्यशैली होती. मग ते द्रमुकचे एमके स्टॅलिन असोत की अण्णाद्रमुकचे ई. पलानिस्वामी. तेलंगणामध्ये त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात कठोर राजकीय मोहीम चालवली होती. यावेळी त्यांचे रेवंथ रेड्डी यांच्याशीही वैयक्तिक संबंध होते. ‘अशा प्रकारे वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यांना राजकारण्यांसोबत काम करणे आणि त्यांच्या टीमलाही त्यांच्या यंत्रणेत सामावून घेणे सोपे होते. काही राजकीय पक्षांना स्ट्रॅटेजिस्ट आणि त्यांच्या टीमबरोबर काम करणे अवघड होते. मात्र हे सुनीलच्या बाबतीत ते घडत नाही,’ असे एकाने सांगितले.
सर्वेक्षणामधून काढण्यात आलेला निष्कर्ष योग्य आणि पक्षाच्या बाजूने वळवणे हे कानुगोलू यांचे सामर्थ्य आहे. तळागाळात, जमिनीवरचे सर्वेक्षण करून त्यांची टीम नेमकी माहिती काढते. त्यानंतर त्यांचे आधुनिक पद्धतीने विश्लेषण करून प्रचाराची रणनिती ठरवण्यात ते पटाईत आहेत. ‘कर्नाटकमध्ये, कानुगोलू यांनी बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या विरोधात ‘पेसीएम’ या मोहिमेला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा त्यांचे विरोधक दक्षिण भारतात भ्रष्टाचार हा फार मोठा मुद्दा नाही, असे निदर्शनास आणून देत होते. पण काय झाले? या मोहिमेमुळे आमच्या पक्षाला सरकारवर हल्ला करण्यासाठी आणि लोकांशी जोडण्यासाठी भरपूर मुद्देमाल सापडला,’ असे काँग्रेसच्या प्रचारावर काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
हे ही वाचा:
कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या
जयंत पाटलांना ईडीकडून दुसरं समन्स
पुन्हा जमताडा… रिल्स बनविण्याच्या छंदापायी त्याने चक्क लॅपटॉपच गायब केला!
‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा अपघात
वर्षभरापूर्वी सुनील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी गुजरातमधील काँग्रेसच्या प्रचारातून अंग काढून घेतले. कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी तळागाळात सर्वेक्षण करून उमेदवारांची निवड केली होती.