ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन खाली उडी घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.
गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी रात्री रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह सापडला. वैयक्तिक कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सुधीर मोरे यांनी आपल्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं होते आणि ते निघाले. त्यांनी सुरक्षारक्षकाला आपल्यासोबत नेलं नव्हतं. मात्र, घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली ते गेले. तिथे साडे अकराच्या दरम्यान रुळावर झोपले. कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतं आहे. दोन महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॅार्ड करण्यासाठी त्यांनी एक नवीन मोबाईल फोन देखील घेतला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा अशी विनंती मोरेंच्या जवळच्या लोकांनी केली आहे.
हे ही वाचा:
केंद्र सरकारकडून ‘वन नेशन वन इलेक्शन’साठी समितीची स्थापना
मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू
एक देश, एक निवडणूक विधेयक संसदेत येणार?
मध्य प्रदेशातील शाळेत हिंदू मुलींच्या हिजाब घातलेल्या फोटोंमुळे खळबळ
सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरीचे संपर्कप्रमुख होते. सुधीर मोरे हे शिवसेनेचे नगरसेवक आणि विभागप्रमुखही होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठींबा दिला होता.