ऊस पेटवून शेतकऱ्यांनी केला शिवसेनेच्या मंत्र्याचा निषेध

ऊस पेटवून शेतकऱ्यांनी केला शिवसेनेच्या मंत्र्याचा निषेध

मुळा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला तोड न दिल्याचा आरोप करून महाराष्ट्रात एका शेतकऱ्याने शेतातील उभा ऊस पेटवून दिला. शेतकरी अशोक टेमक यांनी विधानसभा निवडणुकीत मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात काम केल्याने आमचा ऊस घेतला नसल्याचा आरोप करून, हा ऊस पेटवून दिला. नेवासा तालुक्यातील करजगाव येथे ही घटना घडली.

ही महाराष्ट्रातील एकमेव घटना नाही. आणखी एका शेतकऱ्याने देखील त्याचा हाती आलेला ऊस पेटवून दिला आहे. ऋषिकेश शेटे या सोनई गावचा रहिवासी असणाऱ्या शेतकऱ्याने हे कृत्य केले आहे. या घटनेची दखल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली आहे. यावर सरकारवर निशाणा साधत त्यांनी ट्वीट केले आहे. ऋषिकेश शेटे यांनी असाही आरोप केला आहे की, ‘शिवसेना हा पक्ष दहशत निर्माण करण्यासाठीच आहे का? आमच्यापैकी कोणी जर काही बोलायला गेलं की मंत्री सांगतात, ९० कोटी रुपयांना मंत्रिपद विकत घेतलंय’

या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी दोन ट्वीट केली आहेत. पहिल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात, ‘शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीला कंटाळून १९ फेब्रुवारी रोजी एका शेतकर्‍याने उस पेटविल्यानंतर आज आणखी एका शेतकर्‍याने आपल्या शेतातील उस पेटवून दिला. घाम गाळून कष्ट घेणार्‍या शेतकर्‍याला हाती आलेलं पीक पेटवून देताना काय वेदना झाल्या असतील.’

तर दुसऱ्या ट्वीट मधून त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, ‘अनेक राज्य आणि राष्ट्रांचा भाषणप्रवास करणारे मा. मुख्यमंत्री किमान एकदा तरी मुळा साखर कारखान्याकडून होणार्‍या छळावर बोलणार का आपले मंत्री बाहेर काय उत्तर देतात, तेही कृपया ऐका एकदा’.

Exit mobile version