महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोकण भागाचा दौरा केला. मुख्यमंत्री दौरा करणार हे कळताक्षणीच अनेकांना लगेच पोटदुखी झाली. कारण लोकांना चांगलं बघवत नाही. त्यातूनच मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर विविध पद्धतीची टीका सुरू झाली. मुख्यमंत्री दोनच जिल्ह्यात का गेले? किंवा त्यांनी तीन तासातच दौरा आटोपता घेतला? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या तीन दिवसाच्या दौऱ्याशी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तुलना करत दौर्याच्या कालावधीवर आक्षेप घेण्यात आला. पण यावेळी ही गोष्ट कुणालाच विचारात घ्यावीशी वाटली नाही की ज्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही घरकोंबडा म्हणून टीका करता तेच मुख्यमंत्री महाराष्ट्रसाठी, कोकणी माणसासाठी आपले बहुमूल्य असे तीन तास काढून आले!
त्यांनी ठरवले असते तर त्यांना हा दौरा रद्दही करता आला असता. फेसबुक लाईव्ह सारखे प्रभावी माध्यम त्यांच्या हाताशी आहे. ते माध्यम हाताळण्यात ते पारंगतही आहेत. कोविडच्या या महामारीत मुख्यमंत्र्यांचा फेसबुक संवाद हा महाराष्ट्राच्या जनतेला हवाहवासा वाटतो. लोक त्याची आतुरतेने वाट बघत असतात. कोकणी माणूसही त्याला अपवाद नाही. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळानंतरही मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह संवाद घेतला असता तर त्याचा आस्वाद केवळ कोकणी माणसानेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतला असता. पण तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण पट्ट्यात कोसळलेले विजेचे खांब, त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा, सगळ्या गोष्टी पूर्ववत करायला सक्षम नसणारे त्यांचे सरकार आणि ग्रीड फेल तत्त्वज्ञ मंत्र्यांचे महावितरण खाते, या सगळ्या गोष्टींची कल्पना मुख्यमंत्र्यांना असल्यामुळेच त्यांनी थेट कोकणात जाऊन पाहणी करायचा निर्णय घेतला. पण मुख्यमंत्र्यांचा हा समजूतदारपणा लक्षात न घेता या दौऱ्यावर टीका केली गेली.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला लक्ष्य करताना त्यांनी तीन तासाचा दौरा केला ही टीका सातत्याने करण्यात आली. पण हे करत असताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक किती जणांना करावेसे वाटले? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील कोकण दौरा करत होते. त्यांचा हा दौरा तीन दिवस चालला. पण महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांची क्षमता इतकी अफाट आहे की माजी मुख्यमंत्र्यांना जी परिस्थिती समजून घ्यायला तीन दिवस लागतात ते उद्धव ठाकरे अवघ्या तीन तासात समजून घेतात. त्यामुळे इतके कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाल्याचे खरेतर महाराष्ट्राच्या जनतेला कौतुक वाटले पाहिजे. जनतेने यासाठी देवाचे नाही तरी गेला बाजार शरद पवारांचे तरी ऋणी असले पाहिजे. पण हे सगळं राहिलं बाजूलाच, जनता विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला बळी पडून मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहे.
हे ही वाचा:
वैमानिक दीपक साठे यांची नुकसानभरपाई ठाकरे सरकारने अडवली
लोकांच्या डोळ्यासमोर अंधार झाल्यानंतरच ठाकरे सरकारचे डोळे उघडणार आहेत का?
देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता
अजित दादा, उद्धव ठाकरेंना सल्ला द्या
मराठीत एक म्हण आहे. शितावरून भाताची परीक्षा करणे. पण आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक सुप्त गुण असा आहे की ते शितावरून नाही तर थेट तांदुळाच्या दाण्यावरूनच भाताची परीक्षा करू शकतात. त्यांच्या या क्षमतेमुळे खरंतर मुंबईत बसूनच त्यांना कोकणातल्या परिस्थितीचा इत्तंभूत अंदाज आला होता. इतका की देवेंद्र फडणवीस यांना तीन दिवसांचा दौरा करूनही आला नसेल. पण तरीही कोकणी माणसाला धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे कोकणात पोहोचले. त्यामुळे उगाच ते फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्गला गेले आणि रायगडला गेले नाहीत यावरून त्यांच्यावर टीका करण्यात काहीच अर्थ नाही.
मुख्यमंत्र्यांच्या या कोकण दौर्यात त्यांनी एक गोष्ट खूप स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगितली की त्यांचा पॅकेज वगैरे गोष्टींवर विश्वास नाही. यावरून आता काही जण विचारू शकतील की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना कायम पॅकेजची मागणी का बरं करायची? तर याचं कारण, उद्धव ठाकरे यांचा पॅकेजवर जरी विश्वास नसला तरी फडणवीसांचा मात्र तो होता, आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे तशी मागणी करत होते. पण पॅकेज जरी जाहीर केलं नसलं तरीही मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की कोकणाला योग्य ती मदत नक्की केली जाईल. त्यांनी कोकणी जनतेला तसे आश्वस्त केले आहे. पण मुख्यमंत्र्यांचा हा चांगुलपणा न बघता काही जणांना अजून निसर्ग चक्रीवादळाची मदत मिळाली नसल्याच्या उचक्या सुरू झाल्या आहेत.
एक गोष्ट कोणीच लक्षात घेत नाही की, या सगळ्यात मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केले आहे ते म्हणजे पाठीवर हात ठेवून लढ म्हणा हे सांगण्याचे. सरकार तुमच्यासोबत आहे हा विश्वास ते जनतेला देतात आणि हा विश्वास दिल्यावर जनतेला मग कसल्या पॅकेजची गरजच लागत नाही. मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे ‘मी जबाबदार’ म्हणत सगळ्यांनी आपापली जबाबदारी घ्यावी. त्यातूनही काही जबाबदारी उरलीच तर ती ढकलायला केंद्र सरकार आहेच की! त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या कोकण दौर्यादरम्यान पुन्हा एकदा केंद्राकडे झोळी पसरली. पण त्यांच्या या वर्तनाचाही विपर्यास करण्यात आला. आज कोविडचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्याचा परिणाम राज्याच्या अर्थकारणावरही झालाय. अशा परिस्थितीत राज्य सरकारचा निधी सोशल मीडियावर मंत्र्यांचा पीआर करण्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कामात वापरायचा की नुकसानग्रस्तांना मदत देत बसायची? त्यात परमबीर सिंहांच्या लेटर बॉम्बमुळे वसुली रॅकेट उघडकीस येऊन मंत्र्यांचे कमाईचे इतर मार्गही तात्पुरते बंद झाले आहेत. मग अशावेळी राज्याच्या गरीब, बापुड्या मंत्र्यांनी स्वतःचे गोडवे गायचे तरी कोणाच्या पैशावर? त्यामुळेच राज्याच्या निधीला हात न लावता थेट ‘केंद्राने मदत करावी’ हा पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर त्यांचे काय चुकले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजवरचे महाराष्ट्राला लाभलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांना खुर्चीवर बसवणाऱ्या दस्तुरखुद्द शरद पवारांपेक्षाही उद्धवरावांची कारकीर्द ही जास्त यशस्वी आहे. एक नेता म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिशा दिली आहे. ‘आधी केले मग सांगितले’ हे महाराष्ट्राच्या संतांचे वचन आचरणात आणून ते आदर्श कारभार करत असतात. ‘घरी बसून काम करा’ हे जनतेला सगळेच सांगतात. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आधी स्वतः तसं करतात आणि लोकांना आदर्श घालून देतात. त्यासाठीही त्यांच्यावर टीका होते. यापुढेही होईल. पण यामुळे त्यांचे वर्क फ्रॉम होम थांबले नाही आणि थांबणार ही नाही.
ज्यांना मुख्यमंत्र्यांचा कारभार चुकीचा वाटतो त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हे कधीच चुकत नाहीत, ‘किंबहुना’ ते चुकूच शकत नाहीत. कारण त्यांचे आडनाव ठाकरे आहे आणि ही एक बाब ते सदासर्वकाळ बरोबरच असतात हे सांगायला पुरेशी आहे. त्यामुळे ज्यांना मुख्यमंत्र्यांशी अडचण आहे, त्यांनी कोमट पाणी पिऊन शांत बसावे आणि आपली कुजके बोलणे स्वतःपाशी ठेवावे. अन्यथा आधी आपण महाराष्ट्रद्रोही आहोत हे जाहीर करावे आणि मगच मुख्यमंत्र्यांवर टीका करावी.
स्वानंद गांगल
(मुख्य उपसंपादक, न्यूज डंका)
कधी एकदा खुर्ची खाली करतो याची वाट पाहत आहे जनता.