आगामी काळातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कंबर कसताना दिसत आहे.सत्ताधाऱ्यांविरोधात उभे राहण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या पक्षांना आघाडीत सामील करून घेण्याचे काम सुरु आहे.यामध्ये जास्त चर्चा झाली ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची.महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून इच्छा व्यक्त केली जात होती तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर शिंदे-शिवसेना गटात सामील झाले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे संजय शिरसाट म्हणाले होते.परंतु, अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे.या संदर्भात आज (३० जानेवारी) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटरवर पोस्ट करत याची माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीचं अधिकृत निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देखील देण्यात आलं.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर हे या बैठकीला आले होते.पुंडकर यांनी वंचितचा अजेंडा सर्वांसमोर ठेवून महाविकास आघाडीत समावेश केल्याचं अधिकृत पत्र देण्यात यावं, अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडून करण्यात आली होती.त्यानुसार महाविकासह आघाडीकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’
अभिमानाचा क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारशासाठी नामांकित
तब्बल ३० तासानंतर सोरेन परतले रांचीला
भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या पीएफआयच्या १५ जणांना फाशी!
आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर जी,@Prksh_Ambedkar @VBAforIndia pic.twitter.com/prp036Cu2S
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 30, 2024
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या सह्या असलेल्या पत्रात म्हटले आहे की, देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे”, अशी आमची भूमिका आहे.
३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे”, असे या पत्रात नमूद करून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये समावेश केले आहे.
दरम्यान, आज ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांना एक-दीड तास बाहेर बसवून ठेवण्यात आले होते.त्यावरून वंचितचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया धैर्यवर्धन पुंडकर यांनी माध्यमांसमोर दिली.परंतु, काही वेळातच महाविकास आघाडीकडून पत्र जारी करत वंचितला आघाडीत सामावून घेण्यात आल्याचे स्पष्ट केलं.