‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’

‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना पुन्हा ऑनलाइन वर्ग भरवण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या असून सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळेत जाता येत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात त्याने शाळा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे.

सोलापूर येथील पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या हस्ताक्षरात प्रथमच मराठीतून पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तुम्ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीने प्रत्यक्ष शाळा बंद ठेवत आहात, पण ऑनलाइन शिक्षण खेड्यापाड्यामधील अनेक विद्यार्थ्यांना सोयीसुविधा अभावी घेणे शक्य होत नाही,’ असे कौस्तुभ याने पत्रात म्हटले आहे.

‘गणित, विज्ञानसारखे विषय शिकविण्यासाठी आमचे शिक्षक अनुभवी आहेत पण ऑनलाईन शिक्षण घेताना मर्यादा येतात. या विषयांमध्ये आमचा शैक्षणिक पाया मजबूत होत नाही’, असेही कौस्तुभने पत्रात म्हटले आहे. तुम्ही बोलला होता की, सरसकट ठिकाणच्या शाळा आधी बंद करणार नाहीत, पण तुम्हीच आता सरसकट शाळा बंद करत आहात, तुम्ही तुमचा निर्णय असा अचानक मागे का घेत आहात. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत. तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे त्याने पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

आज १२ आमदारांना निलंबित केले, उद्या १२० जणांना कराल!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात कारखान्यातून बाहेर पडले टाटा सफारीचे १० हजारावे मॉडेल

‘बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या’

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) या संस्थेनेही मुख्यमंत्र्यांना याच संदर्भात पत्र लिहिले आहे. राज्यातील गोरगरीब मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळा बंद करू नका, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार यानेही शिक्षण मंत्र्यांना असेच थेट पत्र लिहित ऑनलाईम शिक्षणाविषयी तक्रार केली आहे. ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी त्याने केली आहे.

Exit mobile version