अकरावीच्या विद्यार्थ्यांचे आता नेमके काय होणार असाच प्रश्न पालक आणि विद्यार्थी वर्गाला आता पडलेला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी मंगळवारपासून सुरू झाली. सीईटी नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच आता महाविद्यालयात प्रवेश कसा मिळणार म्हणून विद्यार्थी तसेच पालक चिंतेत आहेत. कोणती चिंता वाटते आहे त्यांना?
राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महानगरांतील नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रियेत सहभागी असलेल्या, पण सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळण्याबाबत साशंकता असल्याचे स्पष्ट होत असून, दहावीचा निकाल नावापुरताच राहिल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. अकरावीच्या प्रवेशांसाठी राज्य मंडळामार्फत २१ ऑगस्टला सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. ही सीईटी विद्यार्थांना ऐच्छिक असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. त्याच वेळी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
हे ही वाचा:
…आणि नवनीत राणांना अश्रू अनावर झाले
पूरग्रस्तांच्या मनाला डागण्या देणारे दौरे करण्यापेक्षा मुख्यमंत्री घरी बसलेले बरे होते…
निकषांचा विचार न करता तातडीची मदत जाहीर करा
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रा.स्व.संघाचे स्वयंसेवक सरसावले
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये फार चुरस नसते. परंतु पुणे, मुंबईसारख्या शहरांत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी चुरस असते. त्यामुळेच शासनाच्या निर्णयानुसार सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्याने प्रवेश देऊन उर्वरित जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. एकीकडे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी निकालावेळी संकेतस्थळामध्ये प्रचंड तांत्रिक गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांना निकाल बघण्यासाठी अडथळे पार करावे लागले. त्यानंतर निकाल मिळाले. आता इयत्ता अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी संकेतस्थळामध्ये अनेक तांत्रिक अडचणीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला.
अंतर्गत मूल्यमापनात जास्त गुण असून, सीईटी दिलेली नसल्यास संबंधित विद्यार्थ्याला मनासारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही याबाबत अजूनही साशंकताच आहे.