लोकसभा निवडणुकीसाठी आता केवळ १९० दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही विरोधी पक्षाचे एकजुटीने लढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधी आघाडीत कोण राहील, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यातच दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या विधानावरून गदारोळ माजला आहे. त्यानंतर काँग्रेसला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.
दिल्ली काँग्रेसची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीतून बाहेर पडताना दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील सातही जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेस करत असल्याचे विधान केले. तसेच, बैठकीत आम आदमी पक्षाशी आघाडी करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असेही सांगण्यात आले. तर, काँग्रेस नेत्यांकडून असे विधान आल्यानंतर आपच्या नेत्यांकडूनही असे असेल तर मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता आप काय करेल, हा प्रश्न उभा राहिला आहे. काँग्रेसचे दिल्ली आणि पंजाबसारखे अभेद्य गड काबीज करणाऱ्या आपसह काँग्रेस हातमिळवणी करेल का, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
दिल्ली काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, केसी वेणुगोपालसह अन्य वरिष्ठ नेतेही सहभागी झाले होते. ‘काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून एकजूट होऊन लढेल. आम्ही आपसह आघाडीसंदर्भात कोणतीही चर्चा केली नाही. आम्ही पोल खोल यात्रेच्या निमित्ताने केजरीवाल सरकारची धोरणे उघडकीस आणली आहेत. मद्य घोटाळ्यापासून अन्य कारवाया आम्ही केलेल्या तक्रारींनंतर झाल्या आहेत. सन २०२४मध्ये आम्ही निवडणूक लढवू आणि सन २०२५मध्ये अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होणार नाहीत, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,’ असे बैठकीनंतर काँग्रेस नेता अनिल चौधरी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात !
वांद्रे येथील व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल
ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील चर्च आणि इमारतींची तोडफोड !
बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी प्रेयसीने त्याच्या मुलाचा घेतला जीव !
काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनीही आम्ही कार्यकर्त्यांना दिल्लीतील सर्व सात जागांसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगितले. त्यानंतर आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पक्षाची भूमिका मांडली. ‘इंडिया आघाडीच्या सर्व पक्षनेत्यांमध्ये जेव्हा जागावाटपाबाबत चर्चा होईल. तेव्हाच याबाबत अधिक स्पष्टता येईल,’ असे स्पष्ट केले. त्यानंतर काँग्रेसनेही लगोलग पत्रकार परिषद घेऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ‘अलका लांबा एक प्रवक्त्या आहेत. मात्र इतक्या महत्त्वाच्या विषयांवर वक्तव्य करण्यासाठी त्या अधिकृत प्रवक्त्या नाहीत. आज बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मी अलका लांबा यांचे विधान खोडून काढतो,’ असे स्पष्टीकरण दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दीपक बाबारिया यांनी दिले.