त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीची त्सुनामी आली आहे. भाजपाने त्रिपुरातील जवळपास ९८.५% जागांवर यश मिळवले आहे. भाजपाच्या या भूतो न भविष्यती विजयाने सर्वच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. तर भाजपाचे नेते, कार्यकर्ते हा विजय मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत.
त्रिपुरा येथे होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकूण ३३४ जागांपैकी ३२९ जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या दणदणीत विजयासह भाजपाने त्रिपुरातील आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. भाजपाच्या या विजयी वादळात काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष या सर्वांचीच दाणादाण उडाली आहे.
हे ही वाचा:
मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?
‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’
… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक
जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?
त्रिपुरामध्ये पाय रोवू पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. पण त्यांना जनतेने नाकारले. आपल्या भावना व्यक्त करताना ही फक्त सुरुवात आहे आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्रिपुरामध्ये काम करण्यास तयार आहोत असे तृणमूल पक्षतर्फे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या मत मोजणीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. त्रिपुराचा रक्तरंजित राजकीय इतिहास बघता ही खबरदारी घेण्यात आली.