इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण

मोठ्या बैठकांना पूर्णविराम देण्याचा निर्णय

इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण

भाजपाला केंद्रात पर्याय म्हणून देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ या आघाडीची स्थापना केली आहे. गेल्या काही दिवसांत विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये बैठकांचे आयोजन केले होते. नुकतीच ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत पार पडली होती. तर, याआधी बंगळूरू आणि पाटणामध्ये बैठका पार पडल्या होत्या. मात्र, आता यापुढील बैठका होणार नसल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक पार पडली होती. त्यानंतर पुढील म्हणजेच चौथी बैठक भोपाळमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता भोपाळमध्ये बैठक होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इंडिया आघाडीच्या आता मोठ्या बैठका होणार नसून अशा मोठ्या बैठकांना पूर्णविराम देण्याचा निर्णय इंडिया आघाडीनं घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठका आता चेन्नई, कोलकाता अशा इतर राज्यातील शहरात होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीत १३ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची वर्णी लागली आहे. तसेच काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे एम के स्टेलिन, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, आरजेडीचे तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, जावेद अली खान, ललन सिंह, डी राजा आणि ओमर अब्दुला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचा या समन्वय समितीत समावेश आहे.

हे ही वाचा:

सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा

राणे-कीर्तिकरांवर चिडून ठाकरेंनी काढले वड्याचे तेल वांग्यावर…

सौरव गांगुलीच्या चरित्रपटामध्ये रणबीरऐवजी आयुष्मान?

नेपाळला पराभूत करत भारताची सुपर ४ मध्ये धडक

आता केवळ समन्वय समिती आणि इतर समित्यांच्या बैठका होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, १३ सप्टेंबरला शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Exit mobile version