गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. सोलापूर येथे ही घटना घडली असून चार ते पाच अज्ञातांनी पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचे समजते. तर या हल्ल्यात पडळकर यांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचे मात्र नुकसान झाले आहे.

आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर येथे घोंगडी बैठका घेत आहेत. बुधवार, ३० जून रोजी रात्री एक घोंगडी बैठक संपवून दुसऱ्या बैठकीसाठी रवाना होत असतानाच पडळकर यांच्या गाडीवर चार ते पाच अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे. एक मोठा दगड उचलून त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवर फेकण्यात आला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी पडळकर यांच्या गाडीचे मात्र नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

अजित दादांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत दादांचे पत्र

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी

महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?

शालेय पाठ्यपुस्तकात होणार ‘ऐतिहासिक’ सुधारणा

दगडफेकीचा हा प्रकार घडल्यानंतर स्थानिक पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर हे या हल्ल्यानंतर चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. “या हल्ल्यामागे कोण आहेत हे सार्‍या महाराष्ट्राला माहित आहे” अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली आहे. तर मी विचारांची लढाई लढतोय आणि मला गोळी घातली तरी माझा लढा थांबणार नाही असा हल्लाबोल पडळकर यांनी केला आहे.

‘शरद पवारांचा धिक्कार असो’…कार्यकर्त्यांच्या घोषणा
या हल्ल्याच्या काही तास आधी पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार हे साडे तीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत असा टोला पडळकर यांनी लगावला होता. त्यामुळे या हल्ल्यानंतर संशयाची पहिली सुई ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे जात आहे. स्वतः पडळकर यांनी तशी शक्यता बोलून दाखवली आहे. त्यामुळे पडळकर यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले दिसत असून त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. ‘शरद पवारांचा धिक्कार असो…अजित पवारांचा धिक्कार असो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिलेल्या दिसल्या. तर गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ ‘एकच छंद गोपीचंद’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

Exit mobile version