सरपंचाची निवड जनतेतूनच करा

सरपंचाची निवड जनतेतूनच करा

भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील सरपंचांची निवडणूक २०१७ मध्ये फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे थेट जनतेतूनच करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले आहे.

या निवेदनात बावनकुळे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१७ मध्ये सरपंचाची निवड जनतेतूनच करावी असा निर्णय घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला. २०१७ पूर्वी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमार्फतच होत असे, मात्र वारंवार अविश्वास ठराव मांडण्याच्या खेळामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण होत असत. अविश्वास ठराव आणला गेल्यानंतर घोडेबाजाराला ऊत येत असे.
ही परिस्थिती टाळण्यासाठी व ग्रामपंचायत कारभाराला स्थिरता येण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने सरपंचाची निवड जनतेतून करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. या शिफारशीनुसार २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सरपंच निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलला.

हे ही वाचा:

कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष; सर्व यंत्रणा सतर्क

महाराष्ट्राला ‘राष्ट्रीय खनिज विकास’ पुरस्कार

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

राज्य सरपंच संघटनेनेही सरपंचाची निवड निर्वाचित सदस्यांमार्फत करण्यास विरोध दर्शवला होता. आता नवीन सरकारने फडणवीस सरकारचाच निर्णय कायम ठेवावा असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. आता शिंदे- फडणवीस सरकार याबाबत काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version