राज्यात कोरोनाचा थयथयाट, पण ठाकरे सरकार स्मारक उभारण्यात मग्न

राज्यात कोरोनाचा थयथयाट, पण ठाकरे सरकार स्मारक उभारण्यात मग्न

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन ३१ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता महापौर निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई मध्ये मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोरोनाचा नंगा नाच सुरु आहे, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शासन, प्रशासन सोशल डिस्टंसिंगचे डोस देत आहेत. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक एकत्रीकरणावर बंदी आणली आहे. परंतु शिवसेनेला आणि मुख्यमंत्र्यांना हे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.

राज्य शासनाने २०१७ मध्ये तत्कालिन मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या स्थाननिवड समितीने मुंबईतील अनेक जागांची पहाणी करून शिवाजी पार्क नजिकच्या महापौर निवास या स्थानाची निवड केली. देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त समितीची नियुक्ती केली.

हे ही वाचा:

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक… मुंबईत मिळत नाहीयेत रुग्णालयात खाटा, तर नागपपूरात ऑक्सिजनची कमतरता

परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. स्मारकाला नंतर अतिरिक्त भूखंड मिळाला. यामुळे मूळ आराखड्यात बदल करावे लागले. शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती करुन ४०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला.

सामान्य जनतेवर लागू केलेले कोविड-१९ चे नियम आणि लॉकडाउनच्या रोज दिल्या जाणाऱ्या धमक्या या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री हे सगळे नियम पाळून कार्यक्रम कसा पार पाडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Exit mobile version