केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांच्या आधारे राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. अनेक लहान घटक मदतीपासून वंचित आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं आहे. तसेच आदिवासींना २००० रुपये खावटी अनुदान देणं म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
“लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध सरकार लावणार असेल, तर विविध घटकांना सरकारनं मदत केली पाहिजे. पण सरकारनं जाहीर केलेलं ५ हजार ३०० कोटींचं पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. याचं कारण ३ हजार ३०० कोटींची तरतूद कोरोनासंदर्भात सांगण्यात आली आहे, ती रेग्युलर बजेटमधील तरतूद आहे, जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे आताच्या वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाकरिता हे ३ हजार ३०० कोटी रुपये दिलेले नाहीत.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण
अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले
अनिल देशमुखांची आज सीबीआय चौकशी
लस उत्सवात लसीकरणाचा नवा विक्रम, लसीकरण किती झाले? वाचा सविस्तर
“सरकार किती बेड्स, व्हेंटिलेटर वाढवणार, त्याचा कालावधी काय? यासंदर्भातील माहिती सरकारकडून अपेक्षित होती. तसेच, अनेक घटकांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, केशकर्तनालय, छोटे उद्योग वाले नाहीत, कोणालाही कोणतीही मदत केलेली नाही. खरं म्हणजे, यामध्ये दिशाभूल करण्यात आली आहे की, वृद्धापकाळ, श्रावणबाळ या केंद्र सरकारच्या योजना आहेत. यामध्ये सरकार अतिरिक्त हजार रुपये देईल असं वाटलं होतं. पण एकही नवीन पैसा मिळत नसून जो मिळणारच आहे तो थोडा आगाऊ राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे.” असा आरोप फडणवीसांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “आदिवासींना दोन हजार रुपये खावटी अनुदान देणं म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे. कारण गेल्यावर्षीचं मंजूर झालेलं चार हजार रुपयांचं खावटी अनुदान अद्याप देण्यात आलेलं नाही. आणि आता केवळ दोन हजार रुपये सरकार देणार आहे.”