डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ३३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पद आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्यांमध्ये १९ माजी मंत्री आणि १५ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात दोन महिलांचाही समावेश आहे. स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
स्टॅलिन यांच्याकडे महत्त्वाची खाती राहणार आहेत. त्यांच्याकडे गृह, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन, स्पेशल इनिशिएटीव्ह, स्पेशल प्रोग्राम इम्पिलमेन्टेशन अँड वेल्फेअर, एबल्ड पर्सन आदी विभाग असणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं चेन्नईचे माजी महापौर एम. ए. सुब्रमण्यन यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. जलसंधारण विभाग डीएमकेचे महासचिव एस. दुरिमुरुगन यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. उधयनिधींचे निकटवर्तीय अनबिल महेश पोयमोजी यांच्याकडे शालेय शिक्षण विभाग देण्यात आला आहे.
राज्यातील कावेरी खोऱ्याच्या क्षेत्रातून कोणताही मंत्री नियुक्त करण्यात आलेला नाही. बुधवारी स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन्याचा दावा केला होता. स्टॅलिन यांनी तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी १३३ जागा जिंकल्या आहेत. त्यांनी काँग्रेससह काही राजकीय पक्षांशी आघाडी केली होती.
हे ही वाचा:
मुंबईत लवकरच १४ ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार
डीएमकेमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते एम. के. अलागिरी यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल लहान बंधू स्टॅलिन यांचं अभिनंदन केलं. नव्या कारकिर्दीसाठी त्यांनी स्टॅलिन यांना शुभेच्छा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.