राज्यातले एसटी कर्मचारी हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून ते मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या बंगल्याजवळ दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी चप्पल आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
एसटी विलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. न्यायालयाचा निर्णय अन्यायकारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत आणि तेच विलीनीकर न होण्यामागचे सूत्रधार असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी बाहेर आल्या असता कर्मचाऱ्यांनी त्यांना घेराव घातला. कर्मचाऱ्यांनी शांतता राखावी, चर्चेला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा
इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार
मुद्रा योजनेची सात वर्ष! १८.६० कोटी रुपयांची कर्ज वितरित
मुंबई न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्याबाबत राज्य शासनाला आदेश दिले. या आदेशाचं आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. दरम्यान, जोपर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळत नाही तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत निर्णय घेणार नाही, अशी भूमिका या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना मांडली होती. त्यानंतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात एकत्र जमले असून त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपादरम्यान एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे.