गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी हे काही मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आंदोलन करत होते. या आंदोलनाला शुक्रवार, ८ एप्रिल रोजी अचानक वेगळे वळण मिळाले. या काही आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी चप्पलफेक आणि दगडफेक केली. या घटनेनंतर पोलिसांनी १०४ एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे तर गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली.
दरम्यान आज ९ एप्रिल रोजी पहाटे आझाद मैदानावर जमलेल्या या आंदोलकांना मुंबई पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता हटवण्यात आले. त्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सोडण्यात आले. सीएसएमटी स्थानकात या आंदोलकांनी ठिय्या मांडला. मात्र, आता सीएसएमटी स्थानकातूनही त्यांना हटवण्यात येत आहे.
सीएसएमटी स्थानकावरून त्यांना आता रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून हटवण्यात येत असल्याने हे कर्मचारी आता संतप्त झाले आहेत. हे कर्मचारी बसलेले असताना रेल्वेचे टीसी आणि काही पोलीस तिथे पोहचले आणि त्यांनी तिकीटीची विचारणा केली. तसेच तिकीट नसल्यास तुम्ही स्थानकावर थांबू नका, असे त्यांना सांगण्यात आले. इतर प्रवाशांना त्रास होत असल्याची कारणे त्यांना देण्यात आली.
हे ही वाचा:
‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया
सोमय्या पिता पुत्रांना मुंबई पोलिसांचे समन्स
पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती
यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. “राज्य सरकार आमच्याकडे देशद्रोही असल्यासारखे बघत आहेत. आम्ही आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानक परिसर सोडणार नाही. आझाद मैदानावर आम्ही शांत झोपलो होतो, पण यांनी काठ्या मारून आम्हाला सीएसएमटी येथे आणण्यात आले,” अशी तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली आहे.