गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आता एसटी महामंडळ कठोर निर्णय घेत असून महामंडळाने कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या ३०० ते ३५० कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा अशी नोटीस बजावली आहे. या कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील म्हणजेच दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे २ हजार कर्मचारी आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हे ही वाचा:
ठाण्यानंतर भाईंदरमध्ये फेरीवाले आले अंगावर धावून
लोकसत्ताचे पत्रकार राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या
‘महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल’
ऐतिहासिक निर्णय! समलैंगिक सौरभ कृपाल न्यायाधीशपदी
एसटी महामंडळाने आतापर्यंत २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. दरम्यान, मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, आशिष शेलार अशा अनेक नेत्यांनी पाठींबा दर्शवला आहे. महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी विनंतीही करण्यात आली असून कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.