…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन

…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन

भारतातील सर्वात मोठा सण अर्थात दिवाळी हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच राज्यातील एसटी कर्मचारी हे आंदोलनाच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यातील ठाकरे सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता तरी या मागण्या दिवाळीपूर्वी सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे. तसे न झाल्यास २ नोव्हेंबर पासून म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून राज्यभरात एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सध्या कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झालेले पाहायला मिळाले. त्यांचे हक्काचे वेतन त्यांना अनेकदा वेळच्यावेळी झालेले दिसले नाही. या परिस्थितीला कंटाळून राज्यातील तब्बल २५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. त्यामुळे सणासुदीच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनापासून प्रलंबित ठेवले जाऊ नये अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

योगी सरकारने १५१ गुन्हेगारांना ठोकले

१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र

बिल गेट्स का पडले मोदी आणि भारतीय लसीकरण मोहिमेच्या प्रेमात?

करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एक टक्का वेतनवाढीचा दर पक्का करण्यात आला होता. तर ८, १६ आणि २४ टक्क्याने घरभाडे भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण ठाकरे सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के दराने महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेऊनही अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हक्काचे हे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळावे यासाठी कर्मचारी संघटनेमार्फत हा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version