एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने गंभीर रूप धारण केले असून भाजपच्या नेत्यांनी या संपाला पाठींबा दर्शवला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मुंबईमध्ये कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपाला उपस्थित राहून पाठींबा दर्शवला आहे. किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानात येऊन सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. सरकारला झुकावे लागेल. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील सरकारपुढे दुसरा कोणताही मार्ग नसल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. एक अनिल आत आहेत. आता दुसऱ्या अनिलचा नंबर आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
याचवेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही सरकारला पाझर फुटत नाही. मतांच्या वेळी मराठीचे राजकारण करता मग आता आंदोलन करणारे मराठी नाहीत का, असा सवाल पडळकरांनी सरकारला विचारला आहे. तुम्हाला खायला पैसे आहेत, पण एसटी कामगारांना द्यायला पैसे नाहीत, असा टोलाही पडळकरांनी लगावला आहे. काहीही मागणी केली की, महामंडळ तोट्यात असल्याचे सांगितले जाते. तुमच्या खाण्याने महामंडळ फायद्यात येईल कसे? असा सवालही गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे भाजप पक्ष खंबीरपणे उभा आहे असा विश्वासही पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
हे ही वाचा:
३४% जागांवर भाजपाचा बिनविरोध विजय
पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी
‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार
या आंदोलनाला पाठींबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते. विरोधी पक्षनेता म्हणून नाही, तर एस टी कंडक्टरचा मुलगा म्हणून आलोय असे वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केले आहे. मला एसटी कामगारांच्या व्यथा, त्यांचे दु:ख माहित आहे, असेही ते म्हणाले. हे सरकार बहिरे झाले आहे, पण आमचा आवाज तुमच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका दरेकरांनी राज्य सरकारवरकेली आहे. भाजप तुमच्यासोबत आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी १०० वेळा उंबरठे झिजवायला तयार आहोत. अनिल परब यांना हारतुरे घालू, मुख्यमंत्र्यांच्या पाया पडू, पण तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही मागणीसाठी संपाची हाक दिली होती. सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या असून एसटीचे विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन अजूनही सुरू ठेवले आहे.