मुंबईत चालू होणार जल वाहतूक

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी एका नव्या प्रकाराची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईसाठी जल वाहतूक सुरू होऊ शकली, तर ते निश्चितच फायद्याचे ठरणार आहे.

मुंबईत चालू होणार जल वाहतूक

जल टॅक्सी आणि रोपाक्स हे लवकरच मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा हिस्सा असतील. जल टॅक्सी बारा विविध मार्गांवर आणि रोपाक्स चार विविध मार्गांवर डिसेंबर महिन्यापासून चालवण्यात येतील. अशी माहिती मिळत आहे.

केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविय यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत आणि शहरी जल वाहतूक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

हे ही वाचा:

सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ

अयोध्येतील रस्त्याला कोठारी बंधूंचे नाव

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही विनापरीक्षा पास करणार

एएनआयसोबत बोलताना मांडविय यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नौकानयनाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने वेगाने काम करत आहेत. हाजिरा ते गोगा रोपाक्स सेवा ही याचे उदाहरण म्हणून पाहता येईल. केवळ २० आठवड्यात एक लाखापेक्षा जास्त प्रवासी आणि सुमारे २० हजार पेक्षा अधिक चार चाकी गाड्यांची वाहतूक झाली आहे.”

यावेळी मंत्रिमहोदयांनी चार अजून नवे रोपाक्स मार्ग भारतात निर्माण केले जातील अशी माहिती दिली.

“याच पद्धतीने मुंबई ते मांडवा रोपाक्स सेवा चालू केली होती आणि त्याचा परिणाम तुमच्या समोर आहेच. मंत्रालयाने जल मार्गांचा वापर वाहतुकीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नरूळ, करंजा, मोरा, रेवस इथे नवे रोपाक्स मार्ग तयार केले जाणार आहेत.” असे त्यांनी सांगितले.

त्याप्रमाणेच “जल टॅक्सींची सुविधा देखील १२ मार्गांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठीच्या सुविधांचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईत जल वाहतूक वाढली तर मुंबई आणि नवी मुंबई मधील प्रवास सुखाचा आणि सोयीचा होणार आहे. त्याबरोबरच जल वाहतूकीचा पर्याय उपलब्ध झाल्याने रस्त्यांवरील वाहतूक कोंडी देखील कमी होईल.”

सध्या चालू असलेल्या रोपाक्स सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, त्यामुळे मोरापर्यंतच्या प्रवासातला ३ तास ४५ मिनिटांचा वेळ वाचला आहे.

Exit mobile version