काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात आज देशभरातीलप्रमुख अशा १९ विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. या बैठकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी एकतेचा जोरदार नारा देण्यात आला आहे. पण २०२४ ची लोकसभा निवडणूक येई पर्यंत ही एकता आणि या एकतेतील जोर किती टिकतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शुक्रवार, २० ऑगस्ट रोजी काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरातील विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून या बैठकीची चर्चा सर्वत्र रंगली होती. या बैठकीत सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांमध्ये एकता असली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. ‘केवळ संसदेतच नाही तर संसदेच्या बाहेरही विरोधी पक्ष एकत्र असले पाहिजे’ असे सोनिया गांधी म्हणाल्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी विरोधकांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन सोनिया गांधींनी केले. राष्ट्राच्या हितासाठी विरोधकांची एकजूट गरजेची आहे. जी केवळ संसेदत नाही, तर बाहेरही दाखवावी लागेल असे सोनिया गांधी म्हणाल्या. त्यासाठी त्यांनी संसेदत पावसाळी अधिवेशनात करण्यात आलेल्या ओबीसी विधेयकाच्या संदर्भातील दुरुस्तीचा हवाला दिला. विरोधकांच्या एकतेमुळेच ही दुरुस्ती करणे सरकारला भाग पडल्याचा दावा सोनिया गांधींनी केला आहे.
या बैठकीला तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे एम.के.स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. तर या सोबतच झारखंड मुक्ती मोर्चा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय जनता दल, एआयडीयुएफ इत्यादी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे ही वाचा:
पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन
म्हाडाचे रूप पालटण्यासाठी खर्च होणार बाराशे कोटी
मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न
अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख
सपा, बसपाने फिरवली पाठ
या बैठकीचे आमंत्रण उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीलाही देण्यात आले होते. पण या दोन्ही पक्षांनी बैठकीपासून अंतर राखलेले दिसले. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता सपा आणि बसपाची ही अनुपस्थिती फारच नजरेत भरणारी होती. हे बघता विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर याबाबत समाजवादी पार्टीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ता अनुराग भदौरिया यांनी असे सांगितले की सपाचे महत्वाचे नेते रामगोपाल यादव यांच्या घरातील एका सदस्याचे निधन झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी बैठकीस अनुपस्थिती होते.
आम आदमी पक्षाला आमंत्रण नाही
एकीकडे विरोधकांच्या एकतेचा नारा देत असतानाच दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला या बैठकीचे आमंत्रणच दिले गेले नव्हते. आम आदमी पार्टीचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाने आम्हाला आमंत्रण दिले नव्हते असे सांगितले आहे. त्यामुळे याचा संबंध आता पंजाबच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांशी तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे.