‘दिल्लीतील कोणाचीतरी हकालपट्टी करावी’…काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

‘दिल्लीतील कोणाचीतरी हकालपट्टी करावी’…काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

पंजाब राज्याची विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना सत्ताधारी काँग्रेस पक्षातील वाद काही थांबताना दिसत नाहीयेत. तर या वादासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावरही टीका होताना दिसत आहे. आपल्या डीएनएमध्ये काँग्रेस आहे असे म्हणणाऱ्या एका नेत्याने पंजाब मधील राजकीय नाट्यासाठी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ‘दिल्लीतील कोणाचीतरी हकालपट्टी करण्याची गरज आहे’ अशा तिखट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस पक्षाने आधी पंजाब मधील त्यांचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. तर त्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष झालेले नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला. सिद्धू यांच्यापाठोपाठ त्यांचे समर्थक असलेल्या दोन मंत्र्यांनी आणि काही पंजाब काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला. काँग्रेसने स्वकर्तृत्वाने हा पेच प्रसंग ओढवून घेतल्याचे मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत.

तर यातच काँग्रेसचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनीदेखील पक्षाला कानपिचक्या दिल्या आहेत. संजय झा यांनी ट्विट करत काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. ‘दिल्लीतील कोणची तरी हकालपट्टी गरजेची आहे’ असे झा यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याकडे असल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’

..आणि रोहित शर्माने क्रिकेट रसिकांच्या हृदयात घर केले

कोण आहेत फुमियो किशिदा?

अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?

संजय झा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.

“पंजाबवर एक लघुकथा

अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष हा निवडणुकीत मजबूत वाटत होता

सिद्धूने बंडखोरी केली, त्याला दिल्लीने उत्तेजित केले

सिद्धू राज्याचा अध्यक्ष बदला

दिल्लीने कॅप्टनचा अपमान केला

कॅप्टनने राजीनामा दिला

चन्नी मुख्यमंत्री झाले

सिद्धूने राजीनामा दिला

दिल्लीतील कोणाची तरी हकालपट्टी करण्याची गरज आहे.”

Exit mobile version