नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!

नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!

सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा, विदर्भ भागात अक्षरशः थैमान घातले होते. या अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागासाठी नुकसान भरपाई म्हणून १० हजार कोटींची घोषणा केली. मात्र, नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ वगळल्याचे समोर आले आहे.

परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या भागातील सुमारे पाच लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातून पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांची नावे वगळली आहेत. विदर्भातील फक्त नागपूर आणि गडचिरोली या दोनच जिल्ह्यांचा शासन यादीत उल्लेख आहे. उर्वरित एकाही जिल्ह्याचा या यादीत उल्लेख नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! वर्गमित्राचीचं केली हत्या!

मोदी सरकार या १३ विमानतळांचे खासगीकरण करणार

समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

गेल्या नऊ महिन्यात ७७५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी आणि नापीक याला कंटाळून आत्महत्या केली आहे. आपत्ती काळातही सरकारने शेतकऱ्यांची दखल घेतली नव्हती त्यामुळे शेतकरी आणि विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली होती. सरकारतर्फे आणि कोणत्याही मंत्र्याने या भागाचा पाहणीदौरा केला नव्हता त्यामुळेही शेतकरी सरकारवर नाराज होते. नुकसान भरपाईच्या निधीची घोषणा केल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता संपूर्ण पश्चिम विदर्भच शासन यादीतून गायब असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा नाराजी पसरली आहे.

सरकारकडून नुकसानग्रस्त भागाची दखल घेतली जात नसताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर त्यांच्या अजेंडामध्ये मराठवाडा आणि विदर्भ येतच नाही, अशा शब्दात टीका केली होती.

Exit mobile version