24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणकुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान

कुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान

Google News Follow

Related

पाच राज्यांतील निवडणुकीचे तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने असलेले राखले, जमेल तितकी भरही टाकली. आसामचा गड राखला, पुद्दुचेरीत यश मिळवले, तामिळनाडूत द्रमुकचा विजय झाला असला तरी अण्णाद्रमुक-भाजपा युतीचा कडेलोट झाला, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. केरळमध्ये गमावण्यासारखे पूर्वीही काही नव्हते. तरीही निवडणुकीचे विश्लेषण करताना प.बंगालच्या निकालांचा आधार घेत मीडियाने भाजपाला पराभूतांच्या रांगेत उभे केले आहे.

‘प.बंगालमध्ये निवडणुकीत ममतांना हरवणं सोपं नाही’, हे सांगायला संजय राऊतांची काय गरज? शेंबडे पोरही ते सांगू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडीलाही हे ठाऊक होते. परंतु हे घरी बसून फुकाच्या टिमक्या वाजवणारे नेते नाहीत, वाघाच्या गुहेत जाऊन आव्हान देण्याची धमक त्यांच्यात आहे. दोघांनी प.बंगालमध्ये प्रचंड मेहनत घेतली. जिथे संघटन नावाचा प्रकार अस्तित्वात नाही अशा राज्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या समोर जबरदस्त आव्हान निर्माण केले. राज्यात सत्ता येऊ शकते असे वातावरण निर्माण केले. परंतु निवडणुकांचा प्रांत आयपीएलच्या सामन्यांपेक्षा जास्त अनप्रेडीक्टेबल आहे. भाजपाने शर्थ केली तरी ममता यांनी सलग तिसऱ्यांदा नेत्रदीपक विजय संपादन केला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. परंतु भाजपने ३ वरून ७७ पर्यंत मुसंडी मारली त्याचे कौतुक न करण्याचे काहीच कारण नाही.

परंतु तृणमूलच्या विजयानंतर जणू काही बंगालच्या वाघिणीने भाजपाचा खात्मा केलाय, अशा प्रकारचे विश्लेषण भाजपाविरोधी राजकीय पक्ष, कथित विश्लेषक आणि विचारवंताकडून केले जात आहे. बंगालची वाघीण म्हणून ममतांना डोक्यावर घेण्याचा कार्यक्रम पुढे काही दिवसही सुरू राहणार आहे.

हे यापूर्वीही घडले आहे. मोदी विरोधक हे वारंवार करत आलेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर भाजपाच्या वाट्याला अपवादात्मक का होईना परंतु काही कटू पराभव आले. कधी बिहार, कधी दिल्ली, कधी राजस्थान, तर छत्तीसगढ. प्रत्येक पराभवानंतर भाजपाच्या घसरणीला सुरूवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करीष्मा संपला, अशी चर्चा सुरू होते. मोदींना खुर्चीवरून खाली खेचू शकेल असा आभासी नायक निर्माण केला जातो. कधी नीतीश कुमार, कधी केजरीवाल. जो भाजपाच्या विरोधात जिंकला, त्याला तात्पुरता सिकंदर म्हणून घोड्यावर बसवले जाते.
हे सगळं भाजपा आणि मोदींच्या पथ्यावर पडणारे आहे. विरोधक यामुळे एका निवडणुकीकडून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत स्वप्नरंजनात व्यस्त राहतात. भाजपा नेतृत्व यादरम्यान पुढील मोहीमेवर काम सुरू करते. केंद्र सरकारद्वारे धडाक्यात राबवले जाणारे विकास कार्यक्रम आणि संघटनेची बांधणी या द्वीसूत्री द्वारे पुढील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू राहाते. निवडणुका येतात जातात, परंतु भाजपाचे काम थांबत नाही. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांपासून बूथस्तरावरच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण नव्या बांधणीसाठी कामाला लागतात. पक्षाचा कार्यक्रम, केंद्र सरकारची उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवले जातात. हे घडत असताना स्वप्नरंजनात रमलेले मोदीविरोधक मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ आणि केवळ भाजपाविरोधात तीर चालवण्यात मश्गूल असतात. ल्यूटीयन मीडियाला हाताशी धरून भाजपाला सत्तेवरून खेचण्याचे इमले बांधत असतात.

प.बंगालसारखे पराभव भाजपासाठी गरजेचे आहेत. त्यामुळे नेतृत्वाला ’पिक्चर अभी बाकी है’, याचे भान देत असतात. त्यामुळे ९९ टक्के गुण मिळवल्यानंतरही एक गुण मिळाला नाही, म्हणून हिणवणारे पत्रकार, विचारवंत आणि राजकीय पक्ष गेली अनेक वर्षे भाजपासाठी जागल्याचे काम करतायत असेच म्हणावे लागेल. त्यांच्यामुळे भाजपाची आगेकूच सुरू राहाते. विरोधकांनी उभे केलेले औट घटकेचे सिकंदर काही दिवसात चमक गमावतात, नीतीश कुमारांसारखे काही तर थेट भाजपाच्या वळचणीला येऊन उभे राहतात आणि मोदी पुन्हा एकदा उसळी घेऊन पहिल्यापेक्षा मोठे होऊन यांच्या समोर उभे ठाकतात. हा आजवरचा इतिहास आहे. भाजपाला केंद्रातल्या सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आतुर झालेल्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या कंपूला या निवडणुकांनी शॉक दिला आहे.

पंढरपूरमध्ये भाजपाच्या समाधान आवताडे यांच्यासमोर तिघाडीच्या भगीरथ भालकेंची तीन चाकी रिक्षा पंक्चर झाली. भाजपाला कधीही जिंकता आली नाही अशी जागा तीन पक्षांच्याविरुद्ध एक हाती लढून भाजपाने जिंकली. भगीरथ भालके यांचे वडील भरत भालके यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्यांचा मुलगा भगीरथ भालके यांना तिकीट दिल्यामुळे निवडणुकीत सहानुभूतीचा फॅक्टर होताच. परंतु सहानुभूतीच्या तुलनेत ठाकरे सरकारच्या विरुद्ध जनतेच्या मनात असलेल्या असंतोष भारी ठरला. भगीरथ भालकेंसाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावून सुद्धा ते पडले.

परंतु महाविकास आघाडीतले स्थितप्रज्ञ नेते भगीरथ भालकेंच्या पराभवाचे दु:ख झटकून ममतांच्या विजयोत्सव साजरा करताना दिसतायत. त्यांना मोदींचा पराभव करू शकेल असे नेतृत्व ममतांच्या रुपात दिसू लागले आहे. घोड्यावर बसवायला नवा सिकंदर मिळाला आहे. शिवसेना आणि शरद पवारांना त्यांच्या कारकीर्दीत १०० आमदारांचा आकडा गाठता आलेला नाही, भविष्यात तशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे ममतांच्या यशाचे त्यांना मोठे कौतुक वाटणे स्वाभाविकच. ममतांना नसेल इतका आनंद महाविकास आघाडीत सामील असलेल्या तीन पक्षांना झालेला आहे. हा कैफ इतका की, ठाकरे सरकारमधले एक मंत्री नवाब मलिक यांनी तर पंढरपूर हरलोय ही बाब विसरून ‘प.बंगालच्या अपयशाची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी केली आहे. पंढरपूरमध्ये झालेला दारुण पराभव अनुल्लेखाने मारण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु जनता मूर्ख नाही. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात घुसमटणाऱ्यांना पंढरपूरच्या जनतेने धडा शिकवला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने दान भाजपाच्या पारड्यात टाकले आहे.

हे ही वाचा:

आरसीबीच्या सिंहावर मास्क

आयपीएलवरही आता कोरोनाचे संकट

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार

राष्ट्रीय लॉकडाऊन अटळ?

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतरही भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची झळाळी कमी झालेली नाही. पंढरपूरच्या विजयानंतर ती कैकपटीने वाढलेली. महाराष्ट्रातल्या चाय-बिस्कुट मीडियाने सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिसळून चर्चेचा फोकस प.बंगालमधील भाजपाच्या कथित पराभवावर ठेवला आहे. काहीही झाले तरी ठाकरे सरकारला झाकायचे हे मीडियाचे धोरण ठसठशीतपणे समोर आले आहे.

‘रेमडेसीवीर नाही आले तर केंद्र सरकार जबाबदार, केंद्र सरकारने रेमडेसीवीर पाठवले तर मुख्यमंत्र्यांचा विजय’, ही मीडियाची लाईन कायम आहे. सरकारला झाकायचे हे धोरणच असल्यामुळे भाजपाच्या पंढरपूरमधील यशाबद्दल फार चर्चा होणार नाही. तरीही एकटा देवेंद्र काय करू शकतो याची झलक पंढरपूरमध्ये मिळाली आहे. तीन पक्ष एकत्र येऊन भाजपाला रोखणे प्रत्येक वेळा जमेलच असे नाही याचे स्पष्ट संकेत पंढरपूर पोटनिवडणुकीने दिले आहे.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून सतत घरी बसलेले मुख्यमंत्री, केंद्र सरकारकडून दुसऱ्या लाटेबाबत वारंवार इशारे मिळून देखील ढिम्म बसलेले सरकार, राज्यात सुरू असलेले मृत्यूचे तांडव, कोरोनाच्या संकटातही फाळके मारण्याची प्रवृत्ती, विरोधकांना चिरडण्यासाठी चालवलेला वरवंटा अशा अनेक गोष्टी मूकपणे पाहणाऱ्या जनतेने योग्य वेळी संताप व्यक्त केला आहे.

‘पंढरपूरमध्ये तुम्ही यांचा करेक्ट कार्यक्रम करा मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो’, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भाषणातून सांगितले होते. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर आता राज्यात काय होईल याची कुजबुज पुन्हा सुरू झालेली आहे.

राज्यातील सरकार गडगडले तर पुन्हा सत्ता मिळणार नाही या भीतीपोटी एकमेकांना घट्ट चिटकून बसलेल्या या तीन पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करणे सोपे नाही. हे सरकार किती टिकेल, कधी जाईल याचे अनेक मुहूर्त ज्योतिषांनी आजवर जाहीर केले. परंतु हे सरकार चालत नसले तरी पडतही नाही ही वस्तूस्थिती. परंतु पंढरपूरच्या निकालानंतर वारे कोणत्या दिशेने वाहतायत याची एक झलक पाहायला मिळाली.

ठाकरे सरकारचे कित्येक मंत्री तळ ठोकून बसले होते, खुद्द मुख्यमंत्री यांनी कोरोनाबाबत प्रबोधन करण्यासाठी केलेल्या फेसबुक लाईव्हमधून भालकेंचा छुपा प्रचार केला, परंतु तरीही हे तिन्ही पक्ष उताणे पडले. वेळीच सुधारला नाहीत तर तुमची खैर नाही असा इशारा पंढरपूरच्या जनतेने दिला आहे. मुख्यमंत्री महोदय, हवा तेज है, खुर्ची संभालो उड जायेगी…

 

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा