सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई हायकोर्टात महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशावरुनच रश्मी शुक्ला यांनी काही फोनवर देखरेख केली. रश्मी शुक्ला या पोलीस प्रमुखांच्या आदेशांचं पालन करत होत्या. शुक्ला यांनी टेलिग्राफ अधिनियमांनुसार राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही परवानगी घेतली होती. मात्र आता रश्मी शुक्ला यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे, असा दावा त्यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात केला.

महाराष्ट्र सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं होतं, असं रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई हायकोर्टात सांगितलं. पोलीस दलातील बदली आणि बढतीमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. त्यांच्या पडताळणीसाठी सरकारच्या परवानगीने फोन टॅपिंग झाल्याचा दावा रश्मी शुक्ला यांनी कोर्टात केला. इतकंच नाही तर आपल्याला बळीचा बकरा केलं जात आहे, असंही रश्मी शुक्ला म्हणाल्या. आता ५ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी हायकोर्टात बाजू मांडली. “रश्मी शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या, त्यावेळी महाराष्ट्र पोलीस महासंचलाकांनी काही फोन नंबर देखरेखीखाली ठेवण्याचे निर्देश दिले होते. हे नंबर काही राजकारण्यांच्या संपर्कातील होते, जे भ्रष्टाचार करत होते. आवडतं पोस्टिंग आणि ट्रान्सफरसाठी ते लाच मागत होते. त्यामुळेच काही फोन नंबर निगराणीखाली ठेवले होते”, असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केला. न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. अवैध फोन टॅपिंगप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात रश्मी शुक्ला यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

हे ही वाचा:

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं शंभरीत पदार्पण

भारताला हरवत श्रीलंकेने साधली टी-२० मालिकेत बरोबर

भारताचे ‘भूत’ काढणार ‘साहेबांचा’ धूर

फी कपातीची घोषणा झाली, अध्यादेश केव्हा काढणार?

सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांना १७ जुलै २०२० पासून २९ जुलै २०२० पर्यंत फोन टॅपिंगची परवानगी दिली होती. कुंटे यांनी २५ मार्च २०२१ रोजी सरकारला जो रिपोर्ट सादर केला, त्यामध्येही ही बाब नमूद आहे. मात्र ही परवानगी घेताना आपल्याला भ्रमित केलं होतं असं नंतर कुंटेंनी सांगितलं. त्यामुळे आता रश्मी शुक्लांना बळीचा बकरा केलं जात आहे, असं जेठमलानी म्हणाले.

Exit mobile version