मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. गुरुवार १९ मे रोजी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशपांडे आणि धुरी हे न्यायालयाच्या दिलास्याच्या प्रतिक्षेत होते. त्यानुसार त्यांना हा जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने देशपांडे आणि धुरी यांना हा जामीन मंजूर केला आहे.

गेल्या पंधरा ते अठरा दिवसांपासून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही फरार आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यांवरून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस आले होते पण यावेळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आपल्या गाडीत बसून पसार झाले यावेळी एका महिला पोलिस अधिकाऱ्याला इजाही झाली होती तेव्हापासून पोलीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल

पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक

मनसेच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्तेच भिडले

तर या प्रकरणात संतोष साळी यांना देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली होती पण त्यांना देखील आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या आधी त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. संदीप देशपांडे यांचे वाहनचालक राहुल वैष्णव यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली होती.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे आता जामीन मंजूर झाल्यावर संतोष धुरी आणि संदीप देशपांडे जनतेसमोर हजर होणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version