सन २०१९मध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवतील का, यावरून चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राहुल यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली. यावर राहुल गांधी यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या स्मृती इराणी यांना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी अमेठीतून पुन्हा भाजपच जिंकून येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा याच मतदारसंघातून निवडणूक लढवतील का, अशी विचारणा त्यांना केली असता, ‘अमेठीतून कोण लढेल, याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल. मात्र अमेठीतून कोण जिंकेल, याचे उत्तर असेल भाजप,’ असे उत्तर त्यांनी दिले आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्मृती इराणी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ‘मी काय मिळवले, यावर मी आयुष्यात कधीही गर्व केला नाही. तुम्ही ज्यांना प्रतिस्पर्धी म्हणत आहात ते त्यांच्या ताकदीनुसार लढतील. तर, आम्ही आमच्या ताकदीनुसार लढू. मात्र सरकार आमचेच येईल. कोणीही कट्टर शत्रू नसतात. मी सामान्य कुटुंबातून आले आहे. दोन क्षेत्रांत स्वत:चे नाव कमावले आहे. आधी त्यांचे कुटुंब ‘कोण स्मृती?’ असे विचारून माझी निर्भत्सना करत असे,’ याची आठवण त्यांनी करून दिली.
हे ही वाचा:
फक्त २५ किमी; चंद्राच्या सर्वांत जवळच्या कक्षेत पोहोचले लँडर विक्रम
सनी देओलच्या जुहू बंगल्याचा होणार लिलाव !
समान नागरी कायद्यातील ही एक दुर्लक्षित घटनात्मक तरतूद
दिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !
राहुल गांधी हे राजकीय प्रतिस्पर्धी असल्याच्या विधानाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, ‘दोन समान व्यक्ती एकमेकांच्या प्रतिस्पर्धी होऊ शकतात. राहुल गांधी त्यांच्या पक्षाचे मालक आहेत. मी माझ्या पक्षाची कार्यकर्ती आहे. अमेठीबाबत बोलायचे तर, गांधी परिवाराच्या वारशाबाबत खूप गोष्टी बोलल्या जातात. मला मात्र माझे पाय जमिनीवरच ठेवायचे आहेत. सन २०१४मध्ये जेव्हा मी अमेठीला गेले, तेव्हा माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी ३० दिवसांपेक्षा कमी वेळ होता. त्या ३० दिवसांत ६० टक्के बूथवर टेबल लावण्यासाठी माझ्याकडे माणसं नव्हती. तेव्हा मी मुलायमसिंह यादव यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांनी एक लाख मते मुलायम सिंह यांच्या पक्षाला दिली, असे वक्तव्य केले होते.
माझ्यात आणि राहुल गांधी यांच्यातील मतांचा फरक होता, एक लाख पाच हजार. सन २०१९मध्येही प्रत्येक सर्वेक्षणात माझा पराभव होत आहे, असेच जाहीर केले जात होते. गेल्या पाच दशकात गांधी परिवाराने जितकी मते मिळवली, त्यापेक्षा जास्त मते मला मिळाली. फरक एवढाच आहे की गांधी परिवार सपा आणि बसपच्या पाठिंब्याने निवडणूक लढवतात,’ असे स्पष्टीकरण स्मृती इराणी यांनी दिले. सन २०१९मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अमेठीतील जिल्हापरिषदेवरही भाजपचाच विजय झाला. विधानसभेत भाजपचे दोन आमदार आहेत. सन २०२२मध्ये प्रियांका गांधी प्रभारी होत्या. तेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेसच्या पाचपैकी चार उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली, आम्ही तीन वर्षांत त्यांचे तीन लाख मते कमी केली आहेत, असा दावा त्यांनी केला.