प्रजासत्ताक दिनीच दिल्लीतून ट्रॅक्टर रॅली नेण्याच्या संयुक्त किसान मोर्चाच्या प्रयत्नांचे पर्यावसान अत्यंत हिंसाचारात झाले. या हिंसाचारात लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याचे निंदनीय प्रकार देखील घडून आले. त्याशिवाय आंदोलकांनी बसेस आणि गाड्यांची देखील तोडफोड केली. या हिंसाचारात ८० पोलिस देखील जखमी देखील झाले. ट्रॅक्टर रॅली शांततेत पार पाडली जाईल असे आश्वासन दिलेले असतानाही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत मोठा हिंसाचार घडून आला. आता शहाजोगपणे संयुक्त किसान मोर्चाने या हिंसाचाराशी आपला संबंध नसल्याचे एका पत्रकातून स्पष्ट केले आहे.
शेतकरी संघटनेच्या मते सहा महिन्यांचा प्रदीर्घ लढा आणि आता गेले साठ दिवस चालू असलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून ही हिंसाचाराची घटना घडली. शेतकरी संघटनेने काढलेल्या पत्रकात आम्ही आमची शिस्त मोडणाऱ्या प्रत्येक घटकापासून आम्हाला वेगळे करत आहोत. आमची प्रत्येकाला ठरलेल्या मार्गावरून जाण्याची विनंती आहे. आम्ही प्रत्येकाला राष्ट्रीय चिन्हांचा सन्मान अबाधित राखण्याची विनंती करत आहोत आणि अशा कोणत्याही कृत्यापासून लांब राहण्यास सांगत आहोत.
आज घडलेली घटना निंदनीय आणि अस्विकार्ह्य आहे. आमच्या पूर्ण प्रयत्नांनंतरही काही संघटनांनी आणि लोकांनी त्यांचा मार्ग सोडला. काही घुसलेले समाजकंटक सोडले तर शांततामय आंदोलन झाले. असे पत्रक शेतकरी संघटनेने प्रसिद्ध केले आहे.
या प्रकरणाची केंद्र सरकार कसून चौकशी करणार असल्याचे कळले.