भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात येऊन गेल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय. कणकवलीत दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत. खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत दंगल नियंत्रण पथके तैनात केली गेली असून, पोलीसही सज्ज झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सिंधुदुर्गात येत थेट शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला अंगावर घेतले होते. त्यालाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर विनायक राऊत आणि निलेश राणेंच्या वादाला सुरुवात झाली. तोच वाद सिंधुदुर्गात शिगेला पोहोचला आहे.
हे ही वाचा:
“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटारडे आणि विश्वासघातकी आहेत. शाहांच्या हटवादीपणामुळे १७ ते १८ पक्ष एनडीएतून बाहेर पडले. भाजप आणि आणखी एक पक्ष सोडला, तर सर्वच पक्ष एनडीएपासून दुरावले आहेत. त्यामुळे विश्वासघातकी नेमकं कोण, हे आता दिसून येत आहे” अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शाहांच्या टीकेला उत्तर दिले होते.
विशेष म्हणजे विनायक राऊतांच्या टीकेनंतर भाजप नेते निलेश राणेंनीही त्यांना थेट धमकी दिली होती. विनायक राऊत ही खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करुन राऊतांना कोकणातून हद्दपार करू. अशी गर्जना निलेश राणे यांनी केली. तसेच “तुम्ही भाषा बदलली नाहीत तर जिथे दिसाल तिथे फटकावीन.” असा इशाराही निलेश राणे यांनी दिला होता.