संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी व्यायालयात हजर केले गेले. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आले होते.
चौकशी करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणे यांची कोठडी मागितली होती. मात्र, पोलिसांच्या प्रयत्नांना अपयश आले असून न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली आहे. नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी यावर युक्तिवाद करत आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे असा सवाल केला होता. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी देऊ नये असाही युक्तीवाद त्यांनी केला होता.
हे ही वाचा:
‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’
बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महाराष्ट्राच्या चित्ररथाला पॉप्युलर चॉईस पुरस्कार
नितेश राणे यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारावेळी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. राजकीय कारणामुळे नितेश राणेंना या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे, असा युक्तिवाद नितेश राणे यांच्या वकिलाने केला होता. कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याआधी, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान आजच्या सुनावणीवेळी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.