भारतीय जनता पार्टीच्या आमदार पंकजा मुंडे ह्या राज्यात कर्तृत्वाने जनतेच्या कायम लक्षात असतात. असच त्यांनी एका गायिकेला दत्तक घेऊन जनतेच्या मनात अजून स्थान वाढवले आहे. पंकजा मुंडे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली आहे.
शामल सौंदरमल असे या गायिकेचे नाव आहे. शामल ही मूळची बीड जिल्ह्यातील असून ती तिच्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. घरची परिस्थिती बेताची असल्याने हे कुटुंब रोजीरोटीसाठी मुंबईत राहते. शामलकडे गायनाची कला ही तिच्या आईकडून आली, तिची आई किशाबाईही गायिका असून त्या दिव्यांग आहेत. तिच्या आईच्या आवाजातील एक गाणे यापूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारे काव्य किशाबाई यांनी लिहिलं होते. अत्यंत साधेपणाने घरात कणिक मळताना त्यांनी गायलेले हे गाणं पंकजा मुंडे यांनीच फेसबुकवर प्रसिद्ध केलं होत, त्याला खूप प्रतिसाद मिळाला होता. आता आईसारखंच शामलही उत्तम गाणं गाऊ लागली आहे. शामलने ‘ऐ मेर वतन के लोगो..’ हे गायलेले गाणे मुंडे यांनी फेसबुकवर टाकले आहे, या गाण्यालाही खूप प्रसिद्धी मिळत आहे.
हे ही वाचा:
हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास
गोवा निवडणुकीत विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते!
काँग्रेस नेतृत्वावर ‘जी-२३’ क्षेपणास्त्राचा मारा
हे गाणं प्रसिद्ध करण्याबरोबरच मुंडे यांनी, शामलला एक उत्तम गुरु लाभेपर्यंत आपण हिला दत्तक घेतोय, असे आश्वासनही दिले आहे. शामलने नुकतीच पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी तिचे स्वागत केले आणि त्यावेळी तिला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले आहे. एवढंच नाही तर शामलचे देशभक्तीपर गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.