सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ३० डिसेंबर रोजी पार पडली असून शुक्रवारी ३१ डिसेंबरला मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकांमध्ये राणे कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आरोप- प्रत्यारोपांनी ही निवडणुक गाजली होती. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली असून या निवडणुकीचे निकाल आता लागण्यास सुरुवात झाली आहे. वैभववाडी शेती संस्था मतदारसंघातून भाजप उमेदवार दिलीप रावराणे यांनी विजय मिळवला असून भाजपने विजयाचे खाते उघडले. त्यांनी महाविकास आघाडीचे नेते दिगंबर पाटील यांना पराभूत केले.

त्यानंतर भाजपचे उमेदवार मनीष दळवी हे विजयी झाले असून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडे यांचा पराभव केला आहे. देवगड तालुक्यातील मतदार संघातून भाजप उमेदवार प्रकाश बोडस हे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अविनाश माणगावकर यांना पराभूत केले आहे.

भाजप उमेदवार समीर सावंत हे महाविकास आघाडी नेते विकास सावंत यांच्या विरोधात विजयी झाले आहेत. विणकर संस्था, घरबांधणी संस्था, देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्थांमधून भाजपचे संदीप परब यांनी विजय मिळवला आहे. सहकारी पणन संस्था, शेती प्रक्रिया संस्था आणि ग्राहक सहकारी संस्था मतदार संघातून भाजप उमेदवार अतुल काळसेकर हे विजयी झाले आहेत. भाजपचे महेश सारंग विजयी झाले आहेत.

हे ही वाचा:

श्रीनगरमधील चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

मुंबई हाय अलर्टवर, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

महाराष्ट्राच्या महिला कडाडल्या तर पुरुषांमध्ये रेल्वे धडाडली

महाराष्ट्राचा किशोर संघ उपांत्यपूर्व फेरीत; आता राजस्थानला भिडणार

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली होती. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सतीश सावंत पराभूत झाले आणि विठ्ठल देसाई  हे विजयी झाले आहेत. सावंत यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

आतापर्यंत १९ जागांपैकी १० जागांवर भाजपने विजय मिळवून जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्तापित केले आहे. जिल्हा बँकेसाठी ९८.६७ टक्के मतदान झाले असून १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Exit mobile version