अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती, असा दावा केला आहे. अनिल देशमुख यांनी त्या प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा दावाही श्याम मानव यांनी केला आहे. याला अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. मानव यांच्या अध्यक्षतेखालील अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर सामाजिक संघटनांनी आता महाविकास आघाडीच्या समर्थनासाठी, त्यांचा प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र बचाव मोहीम काढण्यात येणार आहे. त्यातूनच अनिल देशमुख यांच्याबद्दल सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.
अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “श्याम मानव यांनी केलेला दावा सत्य असून सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एका व्यक्तीला पाठवलं होते. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यास सांगितलं होतं. सही केल्यास तुमच्या मागे ईडी आणि सीबीआय लागणार नाही, असं प्रलोभन दिलं होतं. तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितलं की कुणावरही खोटे आरोप करणार नाही. प्रतित्रापत्र करून देण्यास नकार दिल्यामुळे ईडी-सीबीआय लावून मला अटक करण्यात आली आहे,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख आणि मानव यांनी एकमेकांच्या या दाव्यांची पुष्टी केली आहे. त्यातून आता पुरोगामी संघटना महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ईडी कारवाईपासून वाचवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ऑफर देण्यात आली होती, असा दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता. ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा, असंही सांगितलं गेल्याचं श्याम मानव यांनी म्हटलं. प्रतिज्ञापत्रावर सही केली तर ठाकरे पिता- पुत्र जेलमध्ये जातील म्हणून अनिल देशमुख यांनी नकार दिला. सही न दिल्याने अनिल देशमुख १३ महिने जेलमध्ये राहिले, असा दावाही श्याम मानव यांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा:
सीएपीएफ, आसाम रायफल्समध्ये आता अग्निवीरांना संधी, १० टक्के जागा आरक्षित
ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन महिलेवर पॅरिसमध्ये बलात्कार
प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले, १८ जणांचा मृत्यू !
प्रतिज्ञापत्रांमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार या चार नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले होते, असं त्यांनी सांगितले. अनिल देशमुख यांनी त्या प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही, यामुळे उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, उबाठा नेते अनिल परब यांच्यासह अजित पवार हे चौघे नेते वाचले आणि अनिल देशमुख कारागृहात गेले, असे श्याम मानव यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी ‘भारत जोडो अभियाना’चा एक भाग म्हणून ‘निर्भय बनो’ अभियान राबविण्यात आले होते. हा सामाजिक संस्था, संघटनांचा मंच होता. त्यात विश्वंभर चौधरी, असीम सरोदे हे महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी सभा घेत होते. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रचार जेव्हा थांबला तेव्हा चौधरी यांनी आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेत असल्याची पोस्ट केली होती. आता त्याच पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर संघटना महाविकास आघाडीसाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.