एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या निषेधासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी हिंसकपणे आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड केली. तर दुसरीकडे ठाण्यात शनिवार, २५ जून रोजी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केले.
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीकांत शिंदे हे गाडीच्या बोनेटवर उभं राहून संवाद साधताना दिसले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसैनिक आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलढाण्यातही शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते.
“गेले तीन चार दिवस आपण पाहत आहात की कशा प्रकारे राजकीय घडामोडी घडत आहेत. आज मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंच्या बरोबर उभे राहण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिलात. ठाण्यासोबत बाहेरही एकनाथ शिंदे यांनी जे काम केले त्यासाठी त्यांना लोकांनी समर्थन दिले. आजही एकनाथ शिंदे हे आपण शिवसैनिक असल्याचेच म्हणत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत आज शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार आहेत. मला वाटतं इतिहासातील ही पहिली घटना असेल की इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला. यासाठी काहीतरी कारण आहे. मनामध्ये जी धुसफूस होती त्याचा विस्फोट झाला आहे. लोक इतक्या संख्येने इथे उपस्थित का आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सत्ता आल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवले होते. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाठवले होते. यावेळी सामान्य नागरिकांनी नाही तर आमदारांनी तेथील खरी परिस्थितीची माहिती दिली. आम्हाला निधी दिला जात नाही. आमच्या मतदार संघातील भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री करतो,” असे बोलत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.
हे ही वाचा:
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘त्या’ ट्विटमुळे अडचणीत
‘क्लीन चिट मिळाल्यामुळे मोदींचे नेतृत्व झळाळून निघाले’
फसलेला डाव आणि पवारांचा थयथयाट…
“आम्हाला निधी मिळाला तर ते थांबवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री करतात. आम्ही विरोधात आहोत निधी मिळत नाही असे आधी सांगत होतो. मात्र, आता सत्तेत असतानाही निधी मिळत नाही. मग काम कसे करायचे. लोकांना न्याय कसा द्यायचा. काय फायदा अशा सत्तेचा,” अशी सणसणीत टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. “आम्ही शिवसंपर्क अभियानावरून परत आल्यानंतर दिल्लीला बैठक झाली. यावेळी आमच्याकडून सर्व माहिती घेण्यात आली. लेखीही लिहून घेतले. तेव्हा आम्ही सामान्य कार्यकर्त्यांच्या जीव महाविकास आघाडीत घुसमट असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी काहीतरी करा त्यांना न्याय मिळवून द्या असेही म्हटले होते. हे आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगत होतो,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
साताऱ्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या साखर कारखान्यामध्ये ऊस विकायला नेला तर त्याचा पक्ष विचारला जातो. शिवसेना म्हटले तर सर्वांत शेवटी ऊसाची खरेदी केली जाते. अशी परिस्थिती शिवसेनेची झाली आहे,” असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.